दिल्लीतील महाराष्ट्र सदनात आज पहिल्यांदाच स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला महाराष्ट्रातील अनेक खासदारांसह राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेसुद्धा उपस्थित होते. या कार्यक्रमानंतर राष्ट्रवादीच्या नेत्या आणि महाराष्ट्र महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी गंभीर आरोप केला आहे.

रुपाली चाकणकर ट्वीटमध्ये म्हणाल्या की, “आज दिल्लीमधील महाराष्ट्र सदन येथे विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी तेथून क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा पुतळा हटविण्याचे दुष्कृत्य करण्यात आले आणि विशेष म्हणजे या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची देखील उपस्थिती होती. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांची जयंती ही अवघ्या तीन दिवसांवर आली असताना देशामध्ये स्त्री सन्मानाच्या चळवळीच्या अग्रस्थानी असलेल्या या दोन महान विभूतींचा हा अपमान आहे, त्यांचं अस्तित्व आणि त्यांचा दैदिप्यमान इतिहास नाकारण्याची मानसिकता उघड करत आहे.”

तसंच, या घडलेल्या प्रकाराची राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी व उपमुख्यमंत्र्यांनी दखल घेऊन योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणीही रुपाली चाकणकरांनी केली आहे.

महाराष्ट्र सदन येथे आज स्वातंत्र्यवीर सावरकर यांची १४० वी जयंती साजरी करण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह उपस्थित मान्यवरांनीही स्वातंत्र्यवीर सावरकर यांना अभिवादन केले. महाराष्ट्र शासनाकडून स्वातंत्र्यवीर सावरकरांची जयंती ‘स्वातंत्र्यवीर गौरव दिन’ म्हणून साजरी करण्यात येत आहे. शासनातर्फे नुकतीच याबाबतची घोषणा करण्यात आली होती. ‘स्वातंत्र्यवीर गौरव दिना’च्या औचित्याने आज ठिकठिकाणी कार्यक्रम आयोजित केले होते.

Story img Loader