मुंबई : विक्रमादित्य सचिन तेंडुलकरला ग्लेन मॅकग्रा, वासिम अक्रम, अॅलन डोनाल्ड, कोर्टनी वॉल्श यांच्या भेदक गोलंदाजीने जितके सतावले नसेल, तितके कसोटी पंच स्टीव्ह बकनॉर यांच्या काही धक्कादायक निर्णयांनी जेरीस आणले. सचिनला अत्यंत चुकीच्या पद्धतीने बाद दिल्यानंतर बकनॉर भारतीय क्रिकेट रसिकांच्या मनातून साफ उतरले. आपले चुकलेच अशी कबुली त्यांनी नुकतीच दिली असली, तरी त्याने सचिनवर झालेल्या घोर अन्यायाची भरपाई होत नाही, अशीच सध्या लाखो सचिनप्रेमींची भावना आहे.
स्टीव्ह बकनॉर सध्या ७९व्या वर्षी निवांत निवृत्तीचे आयुष्य जगत आहेत. पण सचिनला किमान दोन वेळा कसोटी क्रिकेटमध्ये चुकीच्या पद्धतीने बाद दिल्याची सल त्यांच्या मनात अजूनही आहे, हे नुकत्याच ‘वेस्ट इंडिज अम्पायर्स असोसिएशन’ला त्यांनी दिलेल्या मुलाखतीतून जाणवते.
अनुभवी आणि आदरणीय
बकनॉर यांनी १२० कसोटी सामन्यांमध्ये पंच म्हणून काम पाहिले. अनेक विश्वचषक स्पर्धांमध्ये अंतिम सामन्यातही ते पंच म्हणून उभे राहिले. त्या काळात वेस्ट इंडिजचा ऱ्हास सुरू झाला होता. त्या पडत्या काळात स्टीव्ह बकनॉर हे वेस्ट इंडिज क्रिकेटचा चेहरा बनले होते. कारण विश्वचषक स्पर्धांमध्ये हा संघ बऱ्याचदा सुरुवातीच्या फेऱ्यांमध्ये गारद व्हायचा. त्यामुळे अंतिम सामन्यात पंचगिरीसाठी बकनॉर उभे राहिलेले दिसायचेच. ती त्यांच्या कर्तृत्वाला मिळालेली पावतीच होती. इंग्लंडचे डिकी बर्ड आणि डेव्हिड शेफर्ड यांच्याइतकाच आदर बकनॉर यांना मिळू लागला होता. विशेष म्हणजे बकनॉर हे फुटबॉल रेफरीदेखील होते. ‘फिफा’च्या काही आंतरराष्ट्रीय पात्रता सामन्यांमध्ये रेफरी म्हणून त्यांनी जबाबदारी सांभाळली होती. हे सगळे झपाट्याने बदलले, सचिनला बाद देण्याच्या त्या निर्णयानंतर…
ऑस्ट्रेलियात बकनॉर वि. सचिन!
भारतीय संघ २००३-०४ हंगामात ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर गेला होता. ब्रिस्बेन येथे त्या मालिकेतला पहिलाच सामना. गॅब्बा मैदानातील खेळपट्टी नेहमीप्रमाणे गोलंदाजांना साह्य करणारी होती. ऑस्ट्रेलियाचा तेज गोलंदाज जेसन गिलेस्पी समोर होता. सचिन फलंदाजी करत होता. गिलेस्पीचा एक चेंडू सचिनने ‘शोल्डर-आर्म’ करण्याचा, अर्थात सोडून देण्याचा प्रयत्न केला. पण सचिनचा दिशेचा अंदाज थोडा चुकला. चेंडू झटक्यात आत वळला आणि पॅडवर आदळला. गिलेस्पी आणि यष्टिरक्षक अॅडॅम गिलख्रिस्ट यांनी अपील केले. ते पंच स्टीव्ह बकनॉर यांनी उचलून धरले. सचिनचे नैपुण्य पाहता, चेंडू आत येतोय असे पाहिल्यावर त्याने खेळण्याचा प्रयत्न केला असता. पण गॅबाच्या ठणठणीत खेळपट्टीवर चेंडू उसळी घेणार नि यष्टींवरून जाणार हे ठाऊक असल्यामुळे तो काहीसा निर्धास्त राहिला असावा. अशा प्रकारे शोल्डर-आर्म करणे एरवी धोकादायक ठरले असते. मात्र समोर बकनॉर यांच्यासारखे अनुभवी पंच असल्यामुळे बहुधा सचिनने ती जोखीम पत्करली. त्याचा अंदाज सपशेल चुकलाच. कारण बकनॉर यांनी अगदी अनपेक्षितपणे त्याला बाद ठरवले. समालोचक टोनी ग्रेग यांनी तात्काळ या निर्णयाल ‘भयंकर’ (ड्रेडफुल) असे संबोधले. टीव्ही रिप्लेमध्ये चेंडू यष्टींच्या काही इंच वरून जात असल्याचे स्पष्ट दिसून आले. सचिनला त्या निर्णयाने धक्काच बसला. भारताच्या सुदैवाने त्या सामन्यात कर्णधार सौरव गांगुलीने झुंजार शतक झळकावले आणि भारताला तो सामना अनिर्णित राखता आला.
कोलकात्यात बकनॉर वि. सचिन…
बकनॉर यांनी आणखी एकदा सचिनला अशाच प्रकारे बाद दिले. पाकिस्तानचा संघ २००५मध्ये भारत दौऱ्यावर आला होता. पाकिस्तानी गोलंदाज अब्दुर रझ्झाकचा चेंडू सचिनच्या बॅटजवळून गेला. त्यावेळी पाकिस्तानी खेळाडूंनी अपील केले, जे फार जोरकस नव्हतेच. कदाचित पाकिस्तानी खेळाडूंनाही खात्री नव्हती. पण बकनॉर यांना ती होती. त्यांनी सचिनला झेलबाद ठरवले. रिप्लेमध्ये चेंडू आणि बॅटदरम्यान ठसठशीत अंतर असल्याचे दिसून आले. ऑस्ट्रेलियाविरुद्धचा वादग्रस्त निर्णय ताजा होता. त्यात या निर्णयाची भर पडली. बकनॉर सचिनच्या कारकीर्दीवर उठले की काय अशी शंका क्रिकेटप्रेमींकडून उपस्थित केली जाऊ लागली. बकनॉर यांची लोकप्रियता झपाट्याने ओसरू लागली.
खिलाडू सचिनची कोपरखळी
पंचांच्या निर्णयाचा फटका बसणे ही क्रिकेटमधील एक सामान्य बाब आहे हे सचिनने केव्हाच स्वीकारले होते. आता फलंदाजांकडे रेफरलचा पर्याय असतो. त्यामुळे पंचांच्या चुकांचा तितकासा फटका बसत नाही. सचिनच्या काळात – किमान त्याच्या कारकीर्दीत बरीच वर्षे हा पर्याय उपलब्ध नव्हता. सचिनभोवती साऱ्यांचे लक्ष केंद्रित असायचे. वलयाचा झोत त्याच्यावर होता. अपेक्षांचे ओझे प्रचंड असायचे. सचिनची विकेट जय-पराजयातील फरक ठरू शकेल इतकी बहुमोल असायची. त्यामुळे त्याच्या विरोधात अपीलही आक्रमकपणे व्हायचे. सचिन खेळायचा तेव्हा विशेषतः भारतातील मैदानांमध्ये प्रचंड गोंगाटही असायचा. सबब, या सर्व घटकांचे दडपण मैदानावरील पंचांवरही असायचे. केवळ बकनॉर नव्हे, तर डॅरिल हार्पर, बिली बावडेन, सायमन टाउफेल, अलीम दर, के. टी. फ्रान्सिस अशा पंचांच्या चुकीच्या निर्णयाचे फटकेही सचिनला अनेकदा बसले. पण त्याने कधीही आक्रमकपणा दाखवला नाही. त्याच्या शालीन स्वभावाचा तोटाच त्याला झाला का, अशी शंकाही उपस्थित होऊ शकते. तरीदेखील बकनॉर यांच्याविषयी भारतीयांच्या मनात विशेष रोष होता, कारण दोन महत्त्वाच्या सामन्यांमध्ये त्यांनी क्षुल्लक चुका केल्या. त्या त्यांच्या प्रतिमेशी पूर्णपणे प्रतारणा घेणाऱ्या ठरल्या, त्यामुळे अधिक ठळकपणे जाणवल्या. ‘सचिनला बाद केले ही चूकच. पण चुका आयुष्यात सर्वांकडून होतात,’ अशा शब्दांमध्ये त्यांनी नुकत्याच आपल्या भावना मांडल्या. खुद्द सचिनने मात्र त्यांना पूर्वीच माफ केले होते. ‘बकनॉर यांनी मी खेळत असलेल्या सामन्यात बॉक्सिंग ग्लव्ह्ज घालून उतरायला हवे होते’ अशी कोपरखळी त्याने बकनॉर यांच्याविषयीच्या एका प्रश्नाच्या उत्तरादाखल दोन वर्षांपूर्वी मारली. पंचांच्या चुका भोवल्या नसत्या, तर सचिनच्या नावापुढे आणखी कितीतरी शतके लागली असती, हे वास्तव नाकारण्यासारखे नाही. बकनॉर यांच्या माफीनाम्यापूर्वीच सचिनने त्यांना माफ केले आहे. पण क्रिकेटरसिकांच्या नजरेतून बकनॉर अजूनही खलनायकच ठरतात.
siddharth.khandeksr@expressindia.com
