Tukaram Mundhe FDA Notice: स्टिंग एनर्जी ड्रिंकमुळे आरोग्यावर होणाऱ्या दुष्परिणामांचा मुद्दा आज राज्य विधिमंडळ सभागृहात उपस्थित करण्यात आला. श्रागोंदाचे आमदार विक्रम पाचपुते आणि दौंडचे आमदार राहुल कुल यांनी याविषयी प्रश्न उपस्थित केला. यावर उत्तर देताना मंत्री नरहरी झिरवाळ यांनी शैक्षणिक संस्थेपासून किमान ५०० मीटरच्या परिसरात एनर्जी ड्रिंक विक्री करणाऱ्या आस्थापनांची तपासणी करुन नमुने घेणे आणि आक्षेपार्ह जाहिरातीविरुद्ध कारवाई करण्याबाबत ऑक्टोबर २०२४ आणि जानेवारी २०२५ मध्ये दिल्याचे उत्तर दिले. यानंतर अन्न व औषध प्रशासन विभागाचे सचिव तुकाराम मुंढे यांनी राज्यात सुरू असलेल्या सेव्ह ड्रग, सेव्ह फूड मोहिमेबाबत पत्रकार परिषदेत पेप्सिको, रेड बुल, स्टिंगसारख्या कंपन्या नोटीस बजावल्याची माहिती दिली.
तुकाराम मुंढे काय म्हणाले?
“बाजारात जे तथाकथित (सो-कॉल्ड) एनर्जी डिंक्स मिळतात, या सो कॉल्ड एनर्जी ड्रिंक्सच्या कंपन्यांना एनर्जी ड्रिंक्स हा शब्द लिहता येत नाही. याबाबत अन्न व औषध प्रशासनाने ३० जून रोजी त्यांना नोटीस पाठवल्या आहेत, अशा १०-१२ कंपन्या आहेत, पेप्सिको, रेड बुल, स्टिंगसारख्या कंपन्यांना नोटीस बजावली आहे. अन्न व औषध कायद्यात Annexure A मध्ये खाद्यपदार्थांचे प्रकार आहेत. त्यात एनर्जी ड्रिंक्स असा काही प्रकार नाही”, असे तुकाराम मुंढे यांनी स्पष्ट केले.
एनर्जी ड्रिंक असं लिहता कामा नये – मुंढे
“त्यामुळे या आदेशात असे स्पष्ट करण्यात आले आहे की, ज्या आधारे किंवा शेड्युल ४ चा आधार घेऊन एनर्जी ड्रिंक असं लिहता कामा नये, त्याच्याविरोधात अन्न व औषध प्रशासनाने आदेश काढले असून, आता यापुढे असे लिहण्याचा प्रकार बंद होईल”, असेही तुकाराम मुंढे यांनी स्पष्ट केले. तसेच “शाळेच्या आवारात ५०० मीटर परिसरात कोणत्या वस्तू विक्री करता येतील आणि करता येणार नाहीत, याचा देखील सविस्तर आदेश येत्या दिवसात जारी केला जाईल”, असे तुकाराम मुंढे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले.
स्टिंगवरुन विधिमंडळात प्रश्न
दरम्यान, स्टिंगच्या अतिसेवनामुळे हृदयाचे ठोके वाढून अहिल्यानगरमधील श्रीगोंदा, पाथर्डी येथे मुलाचा मृत्यू झाल्याची घटना खरी आहे का? असा प्रश्न श्रीगोंद्याचे आमदार विक्रम पाचपुते यांनी उपस्थित केला. यावर मंत्री नरहरी झिरवाळ यांनी अशी बाब निदर्शनास आली नसल्याचे स्पष्ट केले.
