सांगली जिल्हय़ात दुष्काळी तालुके वगळता पावसाची उघडझाप सुरू असून, चांदोलीच्या वारणा धरणातील पाणीसाठा मंगळवारी सकाळी ६० टक्क्यांवर पोहोचला. कोयना, राधानगरी आणि वारणा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या २४ तासांत १०० मिलिमीटरहून अधिक पावसाची नोंद झाल्याचे जलसंपदा विभागाच्या येथील कार्यालयातून मंगळवारी सायंकाळी सांगण्यात आले.
गेल्या २४ तासांत झालेल्या आणि आज सकाळी ८ वाजता ठिकठिकाणच्या धरणक्षेत्रात नोंदल्या गेलेल्या पावसाची आकडेवारी पुढीलप्रमाणे- कोयना ११० मिलिमीटर, वारणा- १०७, राधानगरी- १०९, धोम- ३१, कण्हेर- ४८ आणि दूधगंगा-७९ मिलिमीटर इतका पाऊस नोंदला गेल्याची माहिती सांगलीच्या जलसंपदा विभागातून देण्यात आली.
कोयना जलाशयात आज सकाळचा पाणीसाठा३४.२७ टीएमसी होता. सांगली जिल्हय़ातील चांदोलीच्या वारणा धरणातील पाणीसाठा २०.३४ टीएमसी झाला असून धरण ६० टक्के भरले आहे. धोम धरणातील पाणीसाठा ४.३९, कण्हेर- ४.८३, राधानगरी ५.७१ आणि दूधगंगा धरणाचा जलसाठा १०.५४ टीएमसी झाला आहे.
शिराळा, इस्लामपूर आणि सांगली, मिरज वगळता अन्य ठिकाणी पावसाचे प्रमाण कमी आहे. जत, आटपाडी, कवठे महांकाळ, विटा, खानापूर तालुक्यांत पावसाचे प्रमाण अत्यल्प आहे. जिल्हय़ात खरिपाच्या पेरणीचे क्षेत्र वाढले असले तरी सुमारे सव्वा दोन लाख हेक्टर क्षेत्र नापेर राहिले आहे. ३ लाख ९२ हजार ५१० हेक्टर क्षेत्रापकी १ लाख ७२ हजार ९२६ हेक्टर क्षेत्रावर खरिपाची पेरणी झाली असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या कृषी विभागातून देण्यात आली.