विठ्ठल आणि रुक्मिणीमातेच्या मूर्तींना वज्रलेप देण्यास प्रारंभ

मूर्तीच्या संवर्धनसाठी चौथ्यांदा वज्रलेप

लोकसत्ता वार्ताहर
पंढरपूर : लाखो वैष्णवांचे श्रद्धास्थान असलेल्या सावळ्या विठूराया आणि रुक्मिणीमातेच्या मूर्तीला वज्रलेप ( रासायनिक लेपन ) करण्यास मंगळवारपासून सुरवात झाली. भारतीय पुरातत्व विभाग, पुरातत्व रसायनतज्ज्ञ,संवर्धन संशोधन प्रयोगशाळा यांच्या मार्गदर्शनाखाली देवाच्या मूर्तीला वज्रलेप करण्यात येणार आहे. दोन दिवस चालणाऱ्या या लेपनात पहिल्या दिवशी मूर्तीची स्वच्छता केली जाणार असून दुसऱ्या दिवशी रासायनिक लेपन केले जाणार असल्याची माहिती मंदिर समितीचे सह-अध्यक्ष ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली आहे. दरम्यान, करोनाच्या पार्श्वभूमीवर विठ्ठल मंदिर ३० जून पर्यंत दर्शनासाठी बंद ठेवण्यात आले आहे.

येथील  विठ्ठल आणि रुक्मिणी मातेची मूर्ती शेकडो वर्षाची जुनी आहे. या मूर्तीवर अनेकदा दुध,दही,साखर,आदीमुळे मूर्तीची झिज होऊ लागली.या पार्श्वभूमीवर मंदिर समितीने पुरातत्व विभागाकडे या मूर्तीचे संवर्धन करण्यासाठी अभिप्राय मागवला होता. त्यानुसार सर्वप्रथम १९८८ साली दोन्ही मूर्तींवर वज्रलेप अर्थात रासायनिक लेपन केले.त्यानंतर २००५ आणि २०१२ रोजी अशा प्रकारचे लेपन मूर्तींवर करण्यात आले. वास्तविक पाहता दर पाच वर्षांनी लेपन केले तर मूर्तींची झिज होणार नाही असे पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शक सूचना होत्या. मात्र पुढील काळात वज्रलेप झाला नाही.

त्यानंतर मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी पुरातत्व विभाग आणि राज्य सरकारकडे पाठपुरावा केला. औरंगाबाद येथील पुरातत्व विभागाच्या पथकाने मूर्तींची पाहणी केली आणि मंगळवारी या लेपन कामाला सुरवात झाली. तत्पूर्वी मंदिर समितीचे सदस्य आणि सल्लागार परिषदेचे ह.भ.प. प्रसाद महाराज अंमळनेरकर,चैतन्य महाराज देगलूरकर,विठ्ठल दादा वासकर महाराज शिवणीकर महाराज या सर्वांनी अनुमती दिली आहे. दोन दिवसात या लेपनाचे काम पूर्ण होणार आहे. देवाची मूर्ती ही पुरातत्व विभागाकडे आहे.या विभागाच्या मार्गदर्शक तत्वानुसार लेपन केले जात असल्याची माहिती ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली आहे. दरम्यान,करोनाच्या पार्श्वभूमीवर मंदिर १८ मार्च पासून बंद आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Stone coating starts in pandharpur of vitthal rakhumai murtis scj

ताज्या बातम्या