आज महाराष्ट्रासह संपूर्ण देशात धुळवड अर्थात धुलिवंदन हा सण मोठ्या उत्साहाने साजरा केला जात आहे. गाव आणि शहरातील प्रत्येक रस्त्यावर प्रत्येक वयोगटातील महिला-पुरुष रंगाने माखलेले दिसत आहे. एकीकडे संपूर्ण देशात एकमेकांना रंग लावून हा सण साजरा होत असताना, सोलापुरातील भोयरे गावात मात्र एकमेकांना दगड मारत धुळवड साजरी करण्यात आली आहे.
दगड मारून धुळवड साजरी करताना काहीजणांना दुखापत झाली आहे. यामध्ये एका व्यक्तीच्या डोक्याला दगड लागून रक्ताची धार उडाली आहे. विशेष म्हणजे डोक्याला दुखापत झाल्यानंतरही संबंधित व्यक्तीला रुग्णालयात दाखल करण्यात आलं नाही. गावातील देवीचा भंडारा जखमेवर लावल्यानंतर जखम बरी होते, असं येथील लोकांचं म्हणणं आहे.
खरं तर, सोलापूर जिल्ह्याच्या मोहोळ तालुक्यातील भोयरे गावात ही दगडांची अनोखी धुळवड खेळली जाते. मागील कित्येक वर्षांपासून ही परंपरा सुरू आहे. जगदंबा देवीच्या मंदिरावर एक गट आणि मंदिराच्या खाली दुसरा गट उभं राहून एकमेकांना दगड मारून ही धुळवड साजरी केली जात. अनेक वर्षांपासून ही परंपरा जोपासली जाते. या दगडफेकीमध्ये जखमी होणाऱ्यांचं प्रमाण अगदी कमी आहे, असं गावातील लोकांचं म्हणणं आहे.
या परंपरेबद्दल अधिक माहिती देताना भोयरे गावचे माजी सरपंच युवराज चव्हाण यांनी सांगितलं, “गेल्या अनेक वर्षांपासूनची ही परंपरा आहे. तुम्ही वैर मनात ठेवून दगड मारला तर तो दगड तुम्हालाच लागतो. त्यामुळे वैर किंवा वाद इथे चालत नाही. चप्पल घालून हा खेळ खेळला जात नाही. अनवाणी पायाने हा खेळ खेळावा लागतो. माझं वय ६० वर्षे आहे. माझ्या आजोबांच्या काळापासून हा खेळ खेळत असल्याचं मी ऐकत आलो आहे. पूर्वीपासून हा खेळ खेळला जातो. हा खेळ आम्ही आमच्या गावात टिकवला आहे.
“दगड लागला तरी तुम्हाला दवाखान्यात जाण्याची गरज नाही. तुम्ही चप्पल घालून दगड मारला तर तुम्हाला रुग्णालयात जाण्याशिवाय पर्याय नसतो. अशा अनेक घटना घडल्या आहेत. दगड लागलेल्या व्यक्तीच्या जखमेवर देवीचा भंडारा लावला की जखम बरी होते,” असंही युवराज चव्हाण म्हणाले.