बीड – शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांचे विभक्त पती तथा शिवसेना शिंदे गटाचे नेते वैजनाथ वाघमारे यांच्या कारवर हल्ला झाल्याची घटना सोमवारी पहाटे होळ ( ता.केज ) जवळ घडली. या दगडफेकीत वैजनाथ वाघमारे यांच्या छातीला दगड लागला असून मुलगा आणि पुतण्यादेखील जखमी झाले आहे याबाबतची माहिती स्वतः वैजनाथ वाघमारे यांनी चित्रफितीद्वारे दिली आहे.
नेमकं काय घडलं?
बीड जिल्ह्यातील होळ ( ता. केज ) येथे सोमवार दि.१८ सप्टेंबर रोजी पहाटे अज्ञात समाजकंटकांनी शिंदे गटाचे नेते वैजनाथ वाघमारे यांच्या चार चाकी वाहनावर अंदाधुंद दगडफेक केली. यामध्ये वाहनात बसलेले वैजनाथ शिंदे यांच्यासह मुलगा आणि पुतण्या देखील जखमी झाले आहेत. आतील भागात देखील दगड फेकण्यात आले होते. वैजनाथ वाघमारे हे अहमदनगर येथील पक्षाची बैठक आटोपून केज मार्गे गावी जात होते. होळजवळ त्यांच्या वाहनावर हल्ला झाला. या हल्ल्यानंतर वैजनाथ वाघमारे यांनी केजमध्ये परत येऊन त्या ठिकाणी स्वतः चित्रफित प्रसारित करून या घटनेची माहिती दिली.




आपल्या जीवाला धोका असल्याचे यापूर्वीच पक्ष आणि पक्षातील वरिष्ठ नेत्यांना कळविले होते. पक्षाचे काम करत असताना रात्री अपरात्री फिरताना अशी घटना घडल्याने आता मी काय करावे असा प्रश्न देखील त्यांनी पक्षश्रेष्ठींना विचारला आहे. यापूर्वीही माझ्यावर असे हल्ले झालेले आहेत मात्र त्याची दखल घेतली जात नसल्याचा आरोप वैजनाथ वाघमारे यांनी केला. दरम्यान या प्रकरणात सोमवारी दुपारी उशिरापर्यंत पोलिसात नोंद झालेली नव्हती