छत्रपती संभाजीनगरमधील किराडपुरा परिसरात आज रात्री दोनच्या सुमारास मोठा राडा झाल्याची घटना घडली. यावेळी अनेक गाड्यांची जाळपोळ करण्यात आली असून दगडफेक झाल्याचीही माहिती आहे. या राड्यावरून भाजपा, शिवसेना (ठाकरे गट) नेते एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत. अशातच. दंगलीवेळी घटनास्थळी गेलेल्या खासदार इम्तियाज जलील यांनी त्यांची आपबिती सांगितली आहे. दंगल रोखायला गेलेल्या जलील यांच्यावर जमावाने दगडफेक केल्याचा दावा त्यांनी केला आहे. तसेच परिस्थिती नियंत्रित आणण्यासाठी अधिक पोलिसांची गरज होती. परंतु पोलीस सुमारे दोन तास उशिरा पोहोचल्याचं त्यांनी सांगितलं. जलील म्हणाले की, मला सुरुवातीला पोलिसांनी सांगितलं की, परिस्थिती नियंत्रणात आहे. त्यामुळे मी घरी थांबलो. क्राईम ब्रँचच्या पीआयला मी फोन केला, त्यांनी एसएमएस करून सांगितलं की, परिस्थिती आमच्या नियंत्रणात आहे. परंतु त्याचवेळी मला लोकांचे मेसेज आणि फोन येत होते की, किराडपुरातली परिस्थिती बिकट आहे. मग मी तिथे जाण्याचा निर्णय घेतला. तिथे गेल्यावर मला भयानक परिस्थिती दिसली. परंतु त्यावेळी किराडपुरातल्या राम मंदिरामध्ये काही व्हायला नको असा माझा प्रयत्न होता. मी लोकांना शांत करण्याचा प्रयत्न करत होतो. इम्तियाज जलील यांनी सांगितली आपबिती खासदार जलील म्हणाले की, मी जमावाला नियंत्रित करण्याच्या प्रयत्नात असताना ते तरूण माझ्यावर मोठमोठे दगड फेकू लागले. त्याचवेळी एक गोष्ट लक्षात आली की, हे तरुण शुद्धीवर नाहीयेत, ते नशेत दिसत होते. नंतर मला समजलं की यापैकी बहुतांश तरुणांनी ड्रग्सचं सेवन केलं आहे. ते कोणाच्याही नियंत्रणात येत नव्हते. माझ्यावर दगड फेकू लागल्यानंतर पोलिसांनी मला बाहेर येऊ नका असं सांगितलं. तरीसुद्धा मी दोन वेळा पोलिसांची काठी घेऊन बाहेर पडलो. पण मला पोलिसांनी माझ्या सुरक्षिततेसाठी आत नेलं. हे ही वाचा >> संभाजीनगरात रात्री दोन गटात राडा, पोलिसांच्या गाड्यांसह खासगी वाहनांची जाळपोळ, किराडपुरात दगडफेक जलील म्हणाले की, "तीन तास हा सर्व प्रकार सुरू होता. या काळात पोलीस कुठे होते? तिथे सुरुवातीला केवळ १५ ते १६ स्थानिक पोलीस कर्मचारी होते. तिथे अधिक पोलीस बळाची आवश्यकता होती. परंतु पोलिसांना तिथे पोहोचायला दोन तास लागले. माझं शहर इतकं मोठं कधी झालं की किराडपुरात पोलिसांना पोहोचायला दोन तास लागले असा प्रश्न मला पडला आहे."