उत्पादन खर्चातील वाढ आणि सूत बाजारातील मंदीच्या परिस्थितीमुळे वाई सूतगिरणीचे उत्पादन थांबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
वाई तालुका सहकारी सूतगिरणीला सूतबाजारातील मंदीचा सामना करावा लागत आहे. सहा हजार चात्यांच्या या सूतगिरणीला सद्या उत्पादन खर्चातील वाढ परवडत नाही. कापसाचे भाव आणि वाढता उत्पादन खर्च, वीज बिलात शासन कोणतीही सवलत देत नसल्याने वीज वापरही परवडत नाही. नुकत्याच झालेल्या सूतगिरणीच्या वार्षकि सर्वसाधारण सभेत याविषयी सभासदांना माहिती देण्यात आली.
नियोजनाच्या अभावामुळे ही सूतगिरणी सुरवातीपासून आíथक अडचणींना सामोरी जात आहे. साखर कारखान्यांसारखे सूतगिरण्यांना बिनव्याजी कर्ज उपलब्ध होत नाही. सद्या एनसीडीसीकडून सूतगिरण्यांसाठी कर्ज प्रस्तावांची शिफारस होत नाही आणि शासन कर्जाला हमी देत नाही, अशा दुहेरी कात्रीत हा उद्योग सापडला आहे. कापूस खरेदीवर अनुदान मिळत नाही आदी अनेक कारणांमुळे उत्पादन बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
उद्योग उभारताना आणि चालविताना सुरुवातीपासून गांभीर्याचा अभाव, व्यापारी वृत्तीतून कामकाज चालविण्याची गरज असताना तसा प्रयत्न होताना दिसला नाही. भांडवल उभारणीसाठी सभासदांना व कार्यकर्त्यांना विश्वासात घेतल्याचे दिसले नाही. कर्ज उभारणीसाठी वेगवेगळय़ा पर्यायांचा वापर व आíथक शिस्त पाळल्याचे दिसून आले नाही. गरजेपेक्षा मोठी इमारत बांधून भांडवल खर्च वाढविण्यात आला. सहा हजार चात्यांच्या सूतगिरणीचा उत्पादन खर्च वाढता असल्याने नऊ किंवा बारा हजार वाढीव चात्यांची सूतगिरणी उभारण्यासाठी नेतृत्वात एकवाक्यता नाही. पदाधिकाऱ्यांना दुखावण्याची मानसिकता ज्येष्ठांमध्ये दिसली नाही. अशा एक ना अनेक कारणांनी सूतगिरणीचे उत्पादन बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. उत्पादन काही कालावधीसाठी थांबविण्यात आल्याचे सांगण्यात येत असले तरी उत्पादन सुरू ठेवण्याचे पर्याय शोधण्याचा प्रयत्न अपुरा ठरत असल्याने वाई सूत गिरणीचे उत्पादनच बंद करण्यात आले आहे.