अमरावती : रविवारी दुपारी अचानक आलेल्या वादळाचा फटका अमरावती शहराला बसला. अनेक ठिकाणी रस्त्यांवरील झाडे उन्मळून पडली. त्यामुळे वाहतूक देखील विस्कळीत झाली होती.

वादळामुळे वीज व्यवस्था विस्कळीत होऊन काही भागाचा वीजपुरवठा खंडित झाला. महावितरण यंत्रणा लागलीच कामाला लागली असून टप्प्याटप्प्याने खंडित झालेला वीजपुरवठा पूर्ववत करण्यात येणार असल्याचे महावितरणच्या वतीने सांगण्यात आले.

२२० केव्ही कोंडेश्वर या पारेषणच्या अति उच्चदाब उपकेंद्रातून अमरावती शहराला वीजपुरवठा करणाऱ्या ३३ केव्ही वडाळी आणि ३३ केव्ही विद्युत नगर या वाहिन्यांचा वीजपुरवठा खंडित झाला होता.परंतु महावितरणच्या तत्पर प्रयत्नाने ३३ केव्ही वडाळी व ३३ केव्ही विद्युत नगर या वाहिनीचा वीजपुरवठा अध्र्या तासातच पूर्ववत करण्यात आला आहे. त्याचबरोबर ११ केव्ही राजकमल, ११ केव्ही एल.आय.सी. ११ केव्ही श्रीकृष्ण पेठ आणि ११ केव्ही मोरबाग या ३३ केव्ही पॉवर हाऊस या उपकेंद्रातून निघणाऱ्या  वाहिन्यांचाही वीजपुरवठा बाधित झाला आहे. याशिवाय २२० केव्ही अमरावती या उच्चदाब उपकेंद्रातून निघणाऱ्या ११ केव्ही वडाली, ११ केव्ही बडनेरा, ११ केव्ही टाऊन ३ आणि ११ केव्ही लक्षमीनगर या वीज वाहिन्यांचाही वीजपुरवठा खंडित झाला आहे.

महावितरण यंत्रणा युद्धस्तरावर कामाला

वादळ एवढे प्रचंड होते की उपलब्ध माहितीनुसार रामपुरी कॅम्प येथे रोहित्र पडले आहे. याशिवाय झाडही वीजवाहिनीवर पडले आहे. पलास लाईन गाडगे नगर येथेही वीजवाहिनीवर झाड पडून वीजवाहिनी तुटली आहे. अशाच प्रकारे इतर ठिकाणाचीही शक्यता नाकारता येत नाही. महावितरण यंत्रणा युद्धस्तरावर कामाला लागली आहे. अधीक्षक अभियंता दिलीप खानंदे, कार्यकारी अभियंता आनंद काटकर या सर्व घडामोडीवर लक्ष देऊन आहेत. वीजपुरवठा सुरळीत करायला थोडा वेळ लागला तरी टप्प्याटप्प्याने वीजपुरवठा सुरळीत करण्यात येणार आहे, असे महावितरणने स्पष्ट केले आहे.