अरबी समुद्रात घोंगावणारे तौते वादळाचा रायगड जिल्ह्याला जोरदार तडाखा बसला. वादळामुळे चौघांचा मृत्यू झाला. तर सहा जण जखमी झाले. जवळपास पाच हजारांहून अधिक घरांची पडझड झाली. तर फळबागांना पुन्हा एकदा वादळाचा तडाखा बसला. किनारपट्टीवरील चारही तालुक्यातील वीज पुरवठा वादळामुळे खंडीत झाला.

तौते वादळ सोमवारी पहाटे रायगड जिल्ह्याच्या किनारपट्टीवरील भागात दाखल झाले. रात्री तीन वाजेपासून वादळी वारे वाहण्यास सुरवात झाली होती. सकाळी आठ नंतर वादळी वाऱ्यांसह पावसालाही सुरवात झाली. दिवसभर सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाच्या सरी कोसळत होत्या. यामुळे वृक्ष उन्मळून पडणे, घरांची पडझड होणे, सखल भागात पाणी शिरणे, विद्यूत खांब पडणे यासारख्या घटना घडत होत्या. समुद्रही खवळलेला होता. वादळाच्या पार्श्वभुमीवर हवामान विभागाने रायगड जिल्ह्यात रेड अलर्ट जारी केला होता.

वादळामुळे जिल्ह्यात चार जणांचा मृत्यू झाला. उरण येथे मंदिराची भिंत कोसळून दोन महिलांचा मृत्यू झाला. नीता नाईक, आणि सुनंदा घरत अशी या महिलांची नावे आहेत. दोघीही भाजी विक्रीसाठी आल्या होत्या. या दुर्घटनेत आणखी एक महिला जखमी झाली. पेण तालुक्यातील गागोदे येथे रामा बाळू कातकरी (वय ८०) यांचा झाडाची फांदी अंगावर पडून मृत्यू झाला. या दुर्घटनेत त्यांच्या पत्नी सीमा रामा कातकरी या जखमी झाल्या आहेत. दोन जनावरं देखील दगावली आहेत. रोहा तालुक्यातील धाटाव औद्योगिक वसाहतीत रमेश नारायण साबळे यांचा अंगावर झाड पडल्याने त्यांचा मृत्यू झाला.

वादळामुळे जिल्ह्यातील जवळपास ५ हजार २४४ घरांची पडझड झाली. तर ९ घरे पुर्ण उध्वस्त झाली. प्रशानाने जीवितहानी टळावी यासाठी ५ हजार २४० कुटूंबातील ८ हजार ३८३ नागरिकांना तात्पुरत्या निवारा केंद्रांमध्ये स्थलांतरीत केले होते. त्यामुळे मोठी जिवीतहानी ठळली. वादळाचा पुन्हा एकदा फटका वीज वितरण व्यवस्थेला बसला. जिल्ह्यातील १३५ उच्च दाब विद्यूत वाहिनीचे खांब, तर ४१८ लघुदाब विद्यूत वाहिनीचे खांब पडले. यामुळे अलिबाग, मुरुड, श्रीवर्धन तालुक्यातील वीज पुरवठा खंडीत झाला.

कोविड रुग्णालयांनाही वादळाचा तडाखा –
जिल्ह्यातील कोविड रुग्णालयांनाही वादळाचा तडाखा बसला. ग्रामीण भागातील २९ रुग्णालयांची विद्युत पुरवठा वादळामुळे खंडीत झाला आहे. या रुग्णालयांना जनरेटरच्या मदतीने सध्या वीज पुरवली जात आहे. पनवेल मनपा हद्दीतही एका रुग्णालयात जनरेटरच्या सहाय्याने वीज पुरवली जात आहेत. जिल्ह्यातील तीनही प्राणवायू निर्मिती प्रकल्प सुरळीत सुरु आहेत. त्यामुळे तीनही प्रकल्पामधून ६५० मेट्रीक टन प्राणवायू निर्मिती आणि वितरण सुरु आहे.