सांगली : ढगाळ हवामान असूनही तीव्र उष्म्यामुळे अस्वस्थ होत असताना सांगलीत मंगळवारी दुपारी सलग दुसऱ्या दिवशी वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. दरम्यान, सोमवारी वादळी वाऱ्यासह झालेल्या या पावसाने कवठेमहांकाळ तालुक्यातील ढालगाव परिसरात घराची भिंत कोसळून एका वृद्धाचा मृत्यू झाला.

कालपासून ढगाळ हवामान असून हवेत उष्मा प्रचंड जाणवत आहे. ३७ अंश तपमान असताना हवेत २५ टक्के आद्र्रता असल्याने ४० अंश तपमान जाणवत होते. सकाळपासून हवेत तीव्र उष्मा जाणवत असताना मंगळवारी दुपारी सांगली शहर परिसरात केवळ दहा मिनिटेच पावसाने हजेरी लावली. मात्र, यामुळे काही प्रमाणात सुखद गारवा निर्माण झाला. तथापि, हा पाऊस केवळ सांगलीपुरताच मर्यादित होता. मिरजेत दुपापर्यंत केवळ ढगाळ हवामान होते.

दरम्यान, मंगळवारी सायंकाळी जोरदार वाऱ्यामुळे कवठेमहांकाळ तालुक्यातील घोरपडी गावातील विठ्ठलनगर परिसरात एका घराची भिंत कोसळून महादेव धारू टेंगले (वय ७५) यांचा जागीच मृत्यू झाला. तहसीलदार गोरे यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. महसूल कर्मचाऱ्यांनी या घटनेचा पंचनामाही केला आहे. तसेच ढालगावमध्ये बिरोबा विद्यालयाच्या चार खोल्यांचे पत्रेही वादळाने उडून पडले आहेत.