अलिबाग- राजकारणात घराणेशाही काही नवीन नाही. राजकारणात असलेल्या अनेक कुटूंबातील सदस्य हे राजकीय वारसा हक्काने निवडणुकीच्या रिंगणात उतरत असतात. पण एकाच पती पत्नींच्या जोड्या निवडणुक रिंगणात उतरल्या तर ती बाब अनेकांच्या भूवया उंचवणारी ठरते. रायगड जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या निमित्ताने याचीच प्रचिती येते आहे. पतीपत्नींच्या अनेक जोड्या संध्या निवडणुक रिंगणात उतरल्या आहेत. त्यामुळे रायगडच्या राजकारणातील घराणेशाहीचा असा पॅटर्न बघुन, कुटूंब रंगलय राजकारणात अशी चर्चा दबक्या आवाजात सुरू झाली आहे.
भाजपच्या चित्रा आस्वाद पाटील या आंबेपूर मतदारसंघातून तर त्यांचे पती आस्वाद पाटील अपक्ष म्हणून शहापूर मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. भाजपच्या प्रियदर्शनी पाटील यांनी चेंढरे जिल्हा परिषद मतदारसंघातून आणि त्यांचे पती संजय पाटील आक्षी पंचायत समिती मतदारसंघातून निवडणूक अर्ज भरला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे अमित नाईक यांनी शहापूर जिल्हा परिषद मतदारसंघातून तर त्यांच्या पत्नी अमृता नाईक दोघेही पंचायत समितीच्या वैजाळी मतदारसंघातून अर्ज दाखल केला आहे. शिवसेना ठाकरे गटाचे महेश गुरव आक्षी पंचायत समिती मतदारसंघातून आणि त्याच्या पत्नी पुजा गुरव चेंढरे जिल्हा परिषद गटातून निवडणुक अर्ज भरला आहे. भाजपचे वैकुंठ पाटील हे पेण मधून दादर जिल्हा परिषद मतदारसंघातून तर त्यांच्या पत्नी शर्मिला वैकुठ पाटील बेणसे मतदारसंघातून जिल्हा परिषद निवडणुकीत उतरले आहेत. शेकापच्या आरती पाटील आणि त्यांचे पती प्रफुल्ल पाटील यांनीही चेंढरे आणि आक्षी पंचायत समिती मतदारसंघातून निवडणूक अर्ज भरला आहे.
एकाच वेळी इतक्या मोठ्या प्रमाणात पतीपत्नींच्या जोड्या निवडणूक रिंगणात उतरण्याची ही पहिलीच वेळ आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत २७ जानेवारी पर्यंत आहे. त्यामुळे या सर्वांचे उमेदवारी अर्ज कायम राहतात की मागे घेतले जातात हे पाहणे औत्सुक्याचे असणार आहे. २७ तारखेनंतर राजकीय चित्र स्पष्ट होणार आहे.
