श्रीवर्धन- श्रीवर्धन शहरात दिवसेंदिवस भटक्या श्वानांची संख्या वाढली असून, हे श्वान स्थानिकांना त्रासदायक ठरत आहेत.काही दिवसांपूर्वी महिलेच्या अंगावर श्वानांच्या टोळक्याने उडी घेत चावा घेतल्याची घटना ताजी असतानाच एका लहान मुलाला श्वानाने हल्ला केल्याची घटना नुकतीच घडली आहे.
श्वानांची पैदास दर सहा ते सात महिन्यांनी होत असून , गेल्या काही वर्षांत शहरात असंख्य मोकाट श्वान भटकताना आढळतात.प्रत्येक पाखाडी , आळीत टोळक्याने बसलेले श्वान हे अनेक वेळा नागरिक , विद्यार्थी , ज्येष्ठ नागरिकांच्या मागे जात हातातील वस्तू ओढणे तसेच चावा घेण्याचा प्रयत्न करणे या प्रकाराने नागरिक त्रस्त झाले आहेत.त्यातही रस्त्याने एकट्या दुकट्या व्यक्तीच्या अंगावर उडी घेत चावा घेण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत.श्रीवर्धन तालुक्यात दिवसेंदिवस मोकाट श्वानांचा उपद्रव वाढला आहे. वर्षभरात १८७ जणांना श्वान दंश झाल्याने नागरिकांमधे दहशतीमुळे भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
श्रीवर्धन नगर परिषदेकडून मोकाट श्वानांचे निर्बिजीकरण , शस्त्रक्रिया करण्याची मोहीम अनेक वर्षांपासून रखडल्याने दरवर्षी श्वानांची संख्या वाढती आहे.नगरपरिषद हद्दीत प्रत्येक नाका, चौकात श्वानांचे टोळके दिसून येते.श्रीवर्धन नगर परिषदेमार्फत भटक्या कुत्र्यांचे निर्बिजीकरण करणे व शस्त्रक्रिया करणे याबाबतीत जाहीर निविदा प्रसिद्ध करण्यात आली होती; परंतु कुठलीही प्राणिमित्र संघटना अथवा ॲनिमल वेल्फेअर एजन्सीने याबाबतीत पुढाकार घेतला नाही.
मोकाट श्वान पकडण्यासाठी प्रशिक्षित कर्मचारी , त्यांना रेबीज लसीकरण करणे , निर्बिजीकरण करणे यासाठी निविदा काढण्यात येणार आहेत.लवकर अंमलबजावणी होईल असे श्रीवर्धन चे उपनगराध्यक्ष अनंत गुरव यांनी सांगितले. दरम्यान शहरी भागात भटके कुत्रे झुंड करून राहतात. रात्रीच्या वेळी हे शहरातील रस्त्यावर झुंडीने फिरतात. काळोखात येणाऱ्या जाणाऱ्यावर भुंकतात. वाहन चालकांच्या मागे लागतात. आणि आक्रमक होऊन बरेचदा लहान मुले, वृध्द माणसांवर हल्ले देखील करतात. त्यामुळे या भटक्या कुत्र्यांचे करायचे काय हा प्रश्न नगर पालिकांना पडला आहे.
प्राणिमित्र संघटनांच्या दबावामुळे गेल्या काही वर्षात जिल्ह्यातील शहरीभागात कुत्र्यांचे निर्बिजीकरण मोहिमा राबविण्यात आल्या. मात्र या मोहिमांना फारसे यश मिळतांना दिसून येत नाही. दरवर्षी लाखो रुपये खर्चूनही शहरी भागात भटक्या कुत्र्याचे प्रमाण कमी झालेल नाही. भटक्या कुत्र्यांना पकडणे हे मोठे जिकरीचे काम ठरते. कुत्रे आक्रमक होऊन हल्ला करत असल्याने नगर पालिकेचे कर्मचारी यासाठी पुढे येत नाही. निर्बिजीकरणानंतर आठ दिवस कुत्र्यांची काळजी घेण गरजेच असते. या कुत्र्यांना ठेवायचे कुठे हा प्रश्न नगरपालिका प्रशासनासमोर असतो. त्यामुळे अनेकदा नगरपालिका या प्रश्नाकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे हा प्रश्न अधिकच जटील होत असल्याचे दिसून येते.
रायगड जिल्ह्यातील श्वानदंश आकडेवारी
सन श्वानदंश
२०२० ८७५७
२०२१ ९१३८
२०२२ १०६२५
२०२३ १६९९४
