हसवतानाच घाबरवणारा चित्रपट

भयपट आणि विनोदी चित्रपट ही तशी दोन टोके. या दोन्ही टोकांना एकत्र आणण्याचा फारसा प्रयत्न हिंदी चित्रपटांमधून झालेला नाही.

stree
'स्त्री'

स्त्री

भयपट आणि विनोदी चित्रपट ही तशी दोन टोके. या दोन्ही टोकांना एकत्र आणण्याचा फारसा प्रयत्न हिंदी चित्रपटांमधून झालेला नाही. अनेकदा विनोदी चित्रपटांतून भूतपिशाच्च संकल्पनेचा वापर वातावरणनिर्मितीसाठी केला गेला आहे. अन्यथा हे दोन स्वतंत्र जॉनर म्हणूनच आले आहेत. अशा वेळी भूतपिशाच्च ही संकल्पनाच मध्यवर्ती ठेवून भयपटाची साचेबद्ध मांडणी न करता त्यात परिस्थितीनुसार विनोदाची फोडणी देत दिग्दर्शक अमर कौशिक याने ‘स्त्री’रंजक पद्धतीने समोर आणला आहे. भय आणि विनोदाचे अफलातून मिश्रण करतानाच नावाप्रमाणेच स्त्रीभोवती असलेल्या अनेक जुनाट कल्पना, बुरसटलेला दृष्टिकोन याचाही समाचार दिग्दर्शकाने घेतला आहे. याचे श्रेय जेवढे दिग्दर्शकाला जाते तेवढेच या चित्रपटाची कथा लिहिणाऱ्या राज निदिमोरू आणि कृष्णा डी. के. या दिग्दर्शकद्वयीलाही जाते.

मध्यप्रदेशातील चंदेरी गावात चित्रपटाची कथा घडते. विकी (राजकुमार राव), बिट्टू (अपारशक्ती खुराणा) आणि दाना (अभिषेक बॅनर्जी) हे तिघे या गावातले ‘अट्टल’ मित्र. विकीच्या वडिलांचे टेलरिंगचे दुकान आहे. विकीचा नवनव्या फॅ शनचे कपडे शिवण्यात हातखंडा आहे, मात्र खास राजेशाही शैलीत जगण्याची सवय असलेल्या विकीला हे काम मान्य नाही. बिट्टूचाही तयार कपडय़ांचा व्यवसाय आहे. आपापली कामे झाली की गावात भटकायचे, आपल्यायोग्य मुलगी शोधत फिरायचे अशी उडाणटप्पूगिरी करणाऱ्या या तिघांचीही स्त्रीशी गाठ पडते. चंदेरी गावात पूजेच्या चार दिवसांत स्त्री नावाचे हे भूत येते आणि घरातील पुरुषांना गायब करते. फक्त त्यांचे कपडे तेवढे घरच्यांसाठी मागे सोडते.

याच दरम्यान विकीची गाठ एका मुलीशी पडते. विकी तिच्या प्रेमात पडला आहे, मात्र ती त्याच्याव्यतिरिक्त कोणाला भेटलेली नाही. विकीचे तिच्या प्रेमात पडणे आणि त्याच वेळी स्त्रीचा गावात झालेला प्रवेश या दोन समांतर पातळीवर सुरू असणाऱ्या गोष्टी एकत्र येतात तेव्हा विकी आणि बिट्टूचा मित्र दानाचाही यात बळी गेलेला असतो. तेव्हा मात्र विकी पेटून उठतो. स्त्रीच्या संदर्भातील सगळे ‘ग्यान’असणारे रुद्र चाचा (पंकज त्रिपाठी) यांच्या मदतीने विकी आणि बिट्टूची दानाला शोधण्याची मोहीम सुरू होते. स्त्री कोण असते, तिच्यामुळे गावात काय गोंधळ होतो, दाना परत मिळतो का, गाव स्त्रीच्या कचाटय़ातून बाहेर येते का, या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी चित्रपट पाहायलाच हवा.

साहाय्यक दिग्दर्शक म्हणून ‘फुकरे’,  ‘नो वन किल्ड जेसिका’, ‘गो गोवा गॉन’ यांसारख्या चित्रपटांवर काम केलेल्या दिग्दर्शक अमर कौशिकचा हा पहिलाच चित्रपट आहे. त्याने याआधी लघुपट स्वतंत्रपणे दिग्दर्शित केला होता. मात्र पहिल्याच प्रयत्नात हॉरर कॉमेडीसारखा एक वेगळा जॉनर त्याने प्रेक्षकांसमोर ठेवला आहे. चित्रपट तुम्हाला दचकवतो आणि तितकाच हसवतो. संकल्पनेच्या बाबतीत जे वेगळेपण चित्रपटात आहे त्यातूनच विषय मांडणी करताना दिग्दर्शकाचा आणि मुळात लेखकांचा गोंधळ उडाला आहे. जो चित्रपटात सातत्याने जाणवत राहतो. कारण इथे स्त्री फक्त भूत म्हणून समोर येत नाही. तिच्या अमानुष वागण्यामागे स्त्रीकडे उपभोगापुरतीच पाहणारा समाज, तिच्या लैंगिक, भावनिक गरजांनाही पायदळी तुडवतो, हा मुद्दा घेऊन या चित्रपटातील भुताच्या गोष्टीला जोडण्यात आला आहे. त्यामुळे ‘ओ स्त्री मत आना’ ते ‘ओ स्त्री रक्षा करना’ इथवर या गावाच्या मानसिकतेचा प्रवास होतो. एका क्षणी बायकोला तू लवकर घरी ये, मला भीती वाटते म्हणणारा पुरुष आपल्याला दिसतो, हे सगळे चांगले मुद्दे असले तरी शेवटपर्यंत या चित्रपटात भूतपिशाच्च संकल्पनेवर विश्वास ठेवायचा की भूतबित काही नसते हे पटवून द्यायचे याबद्दलचा गोंधळ कायम राहतो.

स्त्री या भुताला रोखताना एकाचवेळी तिचा भूत-मनुष्य आणि दुसऱ्याच्या शरीरात शिरून उभा केलेला प्रसंग तकलादू वाटतो. असे अनेक तांत्रिक आणि तार्किक मुद्दे खटकतात. पण राजकुमार राव, अपारशक्ती खुराणा, अभिषेक बॅनर्जी आणि पंकज त्रिपाठी या चौकडीने हा गोंधळ विसरायला लावत आपल्या टायमिंगने प्रेक्षकांची हसवणूक केली आहे. लेडीज टेलर म्हणून केवळ नजरेने माप घेणाऱ्या राजकुमार रावच्या अभिनयाला सगळ्यात जास्त गुण द्यायला हवेत. श्रद्धा कपूरने काम चांगले केले असले तरी तिच्या व्यक्तिरेखेत एकप्रकारची संदिग्धता आहे जी तिच्या चेहऱ्यावरही चित्रपटभर दिसते. अपारशक्ती आणि अभिषेक या दोघांचेही काम अप्रतिम झाले आहे. त्यामुळे उत्तम कथा, दिग्दर्शन आणि अभिनयाच्या जोरावर हा चित्रपट आपल्याला हसवत हसवत घाबरवतो!

* दिग्दर्शक – अमर कौशिक

* कलाकार – श्रद्धा कपूर, राजकुमार राव, अपारशक्ती खुराणा, अभिषेक बॅनर्जी, पंकज त्रिपाठी.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Stree movie review