scorecardresearch

रस्त्यावर लूटमार करणारी टोळी जेरबंद

रस्त्याने रात्री येणाऱ्या-जाणाऱ्या एकटय़ा दुकटय़ा व्यक्तींना अडवून पिस्तूल आणि गुप्तीचा धाक दाखवून लूटमार करणाऱ्या टोळीस सोलापूर शहर पोलिसांनी जेरबंद केले आहे.

Arrested

सोलापूर : रस्त्याने रात्री येणाऱ्या-जाणाऱ्या एकटय़ा दुकटय़ा व्यक्तींना अडवून पिस्तूल आणि गुप्तीचा धाक दाखवून लूटमार करणाऱ्या टोळीस सोलापूर शहर पोलिसांनी जेरबंद केले आहे. या वेळी लुटमारीबरोबर त्या व्यक्तीवर अत्याचारदेखील केले जायचे. शहरातील जुना तुळजापूर नाका ते रूपाभवानी मंदिर रस्त्यावर असे प्रकार घडायचे. या टोळीतील चौघाजणांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून गावठी पिस्तूल व धारदार गुप्तीसह चार स्मार्टफोन आणि दोन दुचाकी वाहने हस्तगत करण्यात आली आहेत. सागर अरूण कांबळे (वय २२, भीमविजय चौक, न्यू बुधवार पेठ, सोलापूर), बुध्दभूषण नागसेन नागटिळक (वय २६, रा. आंबेडकर उद्यानाजवळ, न्यू बुधवार पेठ), सतीश ऊर्फ बाबुला अर्जुन गायकवाड (वय २५, रा. मिलिंदनगर, बुधवार पेठ, सोलापूर) आणि अक्षय प्रकाश थोरात (वय २६, रा. मातोश्री रमाबाई आंबेडकर नगर, न्यू बुधवार पेठ, सोलापूर) अशी त्यांची नावे आहेत. त्यांच्या विरूध्द जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात वेगवेगळय़ा कायद्याखाली गुन्हा दाखल झाला आहे.

यासंदर्भात पोलीस उपायुक्त डॉ. वैशाली कडूकर यांनी दिलेल्या माहितीनुसार जुना तुळजापूर नाका ते रूपाभवानी मंदिर रस्त्यावर रात्री-अपरात्री येणाऱ्या-जाणाऱ्या एकटय़ा-दुकटय़ा व्यक्तींना गाठून ही टोळी त्यांना पिस्तूल वा गुप्तीचा धाक दाखवून मारहाण व लूटमार करायची. एवढेच नव्हे तर पीडित व्यक्तींना अक्षरश: विवस्त्र करून त्यांच्याशी लैंगिक चाळे करीत. त्याहीपेक्षा कहर म्हणजे पीडित व्यक्तींचा अमानुष छळ करून त्यांना जनावरांचे शेण खाण्यासही भाग पाडले जात असे. त्याचे स्मार्ट फोनद्वारे संपूर्ण चित्रीकरण करून ती चित्रफीत समाज माध्यमातून प्रसारीत केली जात असे.

या टोळीची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर जोडभावी पेठ पोलीस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरण पथकाचे फौजदार केतन मांजरे यांनी तेथे सापळा रचला. यात ही संशयित टोळी सापडली. त्यांची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडे गावठी पिस्तूल व तीक्ष्ण गुप्तीसह चार स्मार्ट फोन सापडले. स्मार्ट फोनमधील चित्रफिती पडताळून पाहिल्या असता याच टोळीच्या अमानवी कृत्यांचे कारनामे पाहायला मिळाले. पोलीस आयुक्त हरीश बैजल व उपायुक्त वैशाली कडूकर यांच्यासह सहायक पोलीस आयुक्त डॉ. संतोष गायकवाड, जोडभावी पेठ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळासाहेब भालचिम, पोलीस निरीक्षक विजयालक्ष्मी र्कुी यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई झाली. फौजदार केतन मांजरे, हवालदार आबा थोरात, सुरेश जमादार, अतुल गवळी, खाजप्पा अरेनवरू, थिटे, राजेश घोडके, स्वप्नील कसगावडे, गोपाळ शेळके, दत्ता काटे, बाळू माने आदींच्या पथकाने या कारवाईत भाग घेतला होता.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Street looting gang arrested police ysh

ताज्या बातम्या