दोन गटांत वाद उफाळून आल्याने दिवसभर तणावपूर्ण वातावरण

पालघर : सीएए कायदा आणि एनआरसीविरोधात पुकारलेल्या ‘भारत बंद’ला पालघरमध्ये हिंसक वळण लागले. दोन गटांत वाद झाल्याने शहरात तणाव निर्माण झाला. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीमार करून २० जणांना ताब्यात घेतले.

सीएए आणि एनआरसी कायद्याच्या विरोधात बहुजन क्रांती मोर्चासह अनेक संघटनांनी बंदचे आवाहन केले होते. पालघरमध्ये बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. अनेक व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद ठेवली, तर काही व्यापाऱ्यांनी बंदमध्ये सहभागी न होण्याचाी निर्णय घेतला. कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांच्या मोठा फौजफाटा पालघर शहरात तैनात करण्यात आला होता. त्यामुळे पालघर शहराला छावणीचे स्वरूप आले होते.

बहुजन क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते आणि व्यापारी संघटनांचे पदाधिकारी यांच्यामध्ये मात्र तणाव असल्याचे पाहिला मिळाले. व्यापारी संघटनांचा या बंदला विरोध होता. बंदमध्ये सहभागी न होता दुकाने चालू ठेवणार असल्याचे पत्र व्यापारी असोसिएशनने पालघर पोलीस ठाण्यात दिले होते. बहुजन क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते आणि अन्य आंदोलन दुकाने बंद ठेवण्यात आवाहन करत होते, तर दुसऱ्या बाजुला व्यापारी संघटना आणि भाजप कार्यकर्ते बंदमध्ये सहभागी होऊ नका, दुकाने चालू ठेवा, असे आवाहन करत शहरभर फिरत होते. त्यामुळे आंदोलनकर्ते आणि व्यापारी संघटना व भाजप कार्यकर्ते अशा दोन गटांमध्ये वाद उफाळून आला.

दुपारच्या सुमारास आंदोलनकर्त्यां महिलांनी भाजपचे  नगरसेवक अरुण माने यांच्या दुकानासमोर मोठी गर्दी केली. यावेळी कायद्याचा प्रश्न उपस्थित होऊ  नये यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक गौरव सिंग हेही उपस्थित होते. यादरम्यान व्यापारी संघटनांचे काही पदाधिकारी व भाजपचे नगरसेवक व पदाधिकारी यांना आंदोलनासंदर्भात नोटीस बजावल्यानंतर त्यांनी या विरोधात हालचाली करून पोलिसांना धक्काबुक्की केली. त्यामुळे पोलीस अधीक्षकांनी कायदा व सुव्यवस्था बिघडू नये यासाठी जमाव पांगवण्यासाठी लाठचार्ज करण्याचे आदेश दिले. कायदा सुव्यवस्था बिघडू नये यासाठी हा लाठीचार्ज केल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. दरम्यान, आंदोलकांनी या घटनेचा निषेध केला आहे.

२० आंदोलक ताब्यात

पोलिसांनी २० आंदोलकांना ताब्यात घेतले असून यामध्ये सात महिलांचा समावेश आहे. भाजपचे नगरसेवक अरुण माने, नगरसेविका लक्ष्मीदेवी हजारी आणि अलका राजपूत अशा तिघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले तर भाजप पदाधिकारी तेजराज हजारी, व्यापारी संघटनेचे अरुण जैन व प्रदीप यादव यांनाही ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी आंदोलनकर्त्यांवर सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून राजकीय पदाधिकारी नगरसेवक आणि व्यापारी संघटनांचे पदाधिकारी अशा सहा जणांवर पोलिसांनी बंदच्या पार्श्वभूमीवरत्यांना बजावलेल्या नोटीसचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. आंदोलनकर्त्यांवर सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी पालघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या सर्वाना न्यायालयासमोर हजर करण्यात आले असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी विकास नाईक यांनी दिली. पालघरमध्ये  दोन गटांमध्ये वाद झाल्याने पोलिसांनी जमावाला पांगवण्यासाठी लाठीमार केला.

बोईसरमध्येही तणाव, डहाणूत संमिश्र प्रतिसाद

बोईसर, डहाणू : बोईसरमध्येही दोन गटांत वाद झाल्याने तणाव निर्माण झाला. आंदोलनकर्त्यांनी दुकाने बंद करण्याचे आवाहन केल्याने  तणाव निर्माण झाला. मात्र पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली.  डहाणू तालुक्यात बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. सकाळच्या सुमारास दुकाने बंद होती. मात्र दुपारी पुन्हा उघडण्यात आली.