त्रिपुरातील हिंसाचाराचे पडसाद महाराष्ट्रात पाहायला मिळत आहेत. यावर गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी प्रतिक्रिया देताना, “ लोकांची डोकी भडकावून जाणीवपूर्वक अशातंता निर्माण करणाऱ्याचा प्रयत्न करणाऱ्यांना अजिबात सोडणार नाही. सरकारचे प्राधान्य राज्यात शांतता निर्माण करण्याला आहे.” असे म्हटले आहे.

“ या हिंसाचारप्रकरणी कालपासूनच पोलीस दलाला सर्तक राहण्याचे निर्देश दिले असून पोलीस अधीक्षक, रेंज आयजींना अलर्ट राहण्याच्या सूचनाही दिल्या आहेत. संभाव्य ठिकाणी पोलीस दल दाखल झाले आहे. या घटनेच्या मुळाशी आम्ही जाणार असून जाणीवपूर्वक राज्यात अशांतता निर्माण करणाऱ्यांना आम्ही सोडणार नाही.” असा इशारा देसाई यांनी दिला आहे.

त्रिपुरामधील घटनेच्या पार्श्वभूमीवर अमरावती, मालेगाव, नांदेड यासह अनेक शहरांत काल काही संघटनांनी मोर्चा काढला. या मोर्चाला मोठी गर्दी पाहायला मिळाली. दरम्यान, तिन्ही शहरांत मोर्चाला हिंसक वळण लागल्याने तणावाची स्थिती निर्माण झाली. त्यानंतर आज अनेक संघटनांनी प्रतिमोर्चा काढायला सुरुवात केल्याचे दिसून आले.

शंभुराज देसाई पुढे म्हणाले, अमरावतीत काही लोकांनी बंद पुकारला. मात्र, सकाळपासून पोलीस तैनात करण्यात आले आहेत. जमावाला हटवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. या घटनेच्या मुळीशी आम्ही जाणार असून जाणीवपूर्वक राज्यात अशांतता निर्माण करणाऱ्या, दगडफेक करणाऱ्यांना व त्यांना असे करण्यास प्रवृत्त करणाऱ्यांना आम्ही शोधून काढू. तसे आदेशही पोलीस महानिरीक्षकांना दिले आहेत. होमगार्ड,पोलीस सुरक्षा दल यांनाही आम्ही याकामी उतरविले आहे. या घटनेचा लवकरच सोक्षमोक्ष लावू. यात जे-जे कायदा हातात घेत आहेत, दगडफेक करत आहेत, त्यांच्यावर कडक कारवाई करू, असा इशाराही त्यांनी दिला.काही राजकीय नेते चुकीची व प्रक्षोभक विधाने करून अशांतता व वातावरण गढूळ करण्याचा प्रयत्न करत आहेत, याकडेही देसाई यांनी माध्यमांचे लक्ष वेधले.