मुंबई: राज्यातील एकही गरीब, गरजू बालक हक्काच्या संगोपणापासून वंचित राहू नये यासाठी विविध उपापयोजना केल्या जात आहेत.‘राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमा’ अंतर्गत वर्षातून दोन वेळा विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी केली जाईल. विद्यार्थ्यांचा आरोग्य इतिहास अचूक नोंद व्हावा, यासाठी ही तपासणी पालकांच्या समोरच करण्याच्या सूचना बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिल्या.

राज्यातील गरजू व पात्र बालकांच्या संगोपणाचा एक आढावा मंत्रालयात घेण्यात आला. शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत तटकरे उपस्थित होत्या. या बैठकीत ‘क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजने’ची व्याप्ती वाढवून अधिक प्रभावी अंमलबजावणी करण्याबाबत चर्चा झाली.

सध्या या योजनेतून प्रति बालक दरमहा २ हजार २५० रुपयांचे परिपोषण अनुदान दिले जाते. राज्यात एकल पालक (आई किंवा वडील नसलेले) किंवा दोन्ही पालक गमावलेल्या बालकांची संख्या मोठी आहे. अशा सर्व पात्र व गरजू वंचित विद्यार्थ्यांना शालेय शिक्षण विभागाच्या समन्वयाने आणि आधार संलग्नतेच्या माध्यमातून या योजनेचा १००% लाभ मिळवून देण्याचा प्रस्ताव आहे.

या योजनेत पात्र असलेल्या विद्यार्थ्यांचे अर्ज भरून ते महिला व बालविकास विभागाकडे सादर करण्यासाठी जिल्हा परिषद व इतर शाळांच्या मुख्याध्यापकांनी पुढाकार घेण्याच्या सूचना करण्यात आल्या. प्री-स्कूल अभ्यासक्रमासाठी सध्या महिला विकास विभागाकडे विभागाकडे ५० हजार अंगणवाडी सेविकांची नोंदणी झाली आहे. शिल्लक सेविकांची नोंदणीही लवकरच पूर्ण केली जाईल. पात्रताधारक अंगणवाडी सेविकांना शालेय शिक्षण विभागामार्फत ६ महिन्यांचे विशेष प्रशिक्षण तातडीने दिले जाणार असल्याचे तटकरे यांनी सांगितले.

‘राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमा’ अंतर्गत वर्षातून दोन वेळा विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी केली जाईल. विद्यार्थ्यांचा आरोग्य इतिहास अचूक कळावा, यासाठी ही तपासणी पालकांच्या समोरच करण्याच्या सूचना तटकरे यांनी दिल्या. अनाथ, निराश्रित आणि निवाऱ्याची गरज असलेल्या बालकांना सुरक्षित आणि उज्ज्वल भविष्य देण्यासाठी महिला विकास विभाग सर्वतोपरी प्रयत्न करीत असल्याचे तटकरे यांनी सांगितले. या बैठकीला शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजित सिंह देओल, एकाात्मिक बाल विकास सेवा योजनेच्या आयुक्त माधवी सरदेशमुख उपस्थित होत्या.