scorecardresearch

अभिनव उपक्रमांमुळे जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये लक्षणीय पटवाढ ; रत्नागिरी जिल्हा परिषदेची कामगिरी 

शैक्षणिक दर्जा, पायाभूत सुविधांसह इंग्रजी माध्यमांकडे विद्यार्थी आणि पालकांचा कल वाढू लागल्यामुळे या शाळांचा पट सतत घसरत राहिला.

अभिनव उपक्रमांमुळे जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये लक्षणीय पटवाढ ; रत्नागिरी जिल्हा परिषदेची कामगिरी 
(संग्रहित छायाचित्र)

सतीश कामत, लोकसत्ता

रत्नागिरी : जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये जाणीवपूर्वक राबवण्यात आलेल्या अभिनव शैक्षणिक उपक्रमांचा पटवाढीसाठी फायदा झाला असून गेल्या दोन वर्षांत या शाळांमध्ये एकूण सुमारे चौदाशे विद्यार्थ्यांची वाढ झाली आहे.  जिल्हा परिषद शाळांचा पट दिवसेंदिवस कमी होत असल्याचे चित्र मागील काही वर्षे राज्यातील अनेक ठिकाणी दिसत आहे. शैक्षणिक दर्जा, पायाभूत सुविधांसह इंग्रजी माध्यमांकडे विद्यार्थी आणि पालकांचा कल वाढू लागल्यामुळे या शाळांचा पट सतत घसरत राहिला. त्यावर मात करण्यासाठी शासनाच्या विविध उपक्रमांबरोबरच रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने विशेष नियोजन केले.

जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी (प्राथमिक) वामन जगदाळे यांनी या संदर्भात सांगितले की, करोनामुळे टाळेबंदीच्या कालावधीत इंटरनेटच्या माध्यमातूनही अध्ययनाचे पर्याय उपलब्ध करून दिले. तसेच ही सुविधा नसलेल्या ठिकाणी शिक्षकांनी स्वत: जाऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विशेष म्हणजे, या शाळांमधील १ली ते ८ वीच्या विद्यार्थ्यांसाठी शिक्षकांनी स्वत:च्या स्वाध्याय पुस्तिका कमी कालावधीत सर्वदूर पोहोच केल्या. मोकळा श्वास, पहिलं पाऊल, रत्नागिरीचा भास्कराचार्य,  , जाणू विज्ञान, अनुभवू विज्ञान, यांसारखे कल्पक उपक्रम, त्याचबरोबर रत्नागिरी टॅलेंट सर्च शिष्यवृत्ती व सराव परीक्षांवर विशेष लक्ष यासारख्या विविधांगी प्रयत्नांमुळे या शाळांचा शैक्षणिक दर्जा सुधारत असून विद्यार्थ्यांचा सर्वागीण विकास होताना दिसत आहे. जिल्हा परिषद शाळांच्या पटवाढीला या उपक्रमांचा फायदा झाला आहे.

 हा वाढत असलेला पट टिकवण्यासाठी शाळापूर्व तयारी मेळावे, स्वाध्याय उपक्रम, गणवेश, पाठय़पुस्तक इत्यादी उपक्रमही परिणामकारकपणे राबवले जात आहेत. शैक्षणिक गुणवत्ता वाढ, शिष्यवृत्तीचा चांगला निकाल, सेमी इंग्रजी वर्ग, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन यामुळे सुजाण पालकांचा जिल्हा परिषद शाळांमध्ये ओढा वाढत चालला आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदुराणी जाखड यांनी या मोहिमेकडे विशेष लक्ष दिले होते. त्यामुळे यंदाच्या नवोदयह्णच्या निकालातही ८० विद्यार्थ्यांपैकी ४८ विद्यार्थी जिल्हा परिषद शाळांचे निवडले गेले आहेत, असेही जगदाळे यांनी नमूद केले.

६३ स्थलांतरित, ४ शाळाबाह्य: मिशन झिरो ड्रॉप आऊट ही मोहीम ५ ते २० जुलै या कालावधीत जिल्ह्याच्या ग्रामीण भागात यशस्वीपणे राबवण्यात आली. यामध्ये ३ ते १८ वर्षे वयोगटातील बालकांचे सर्वेक्षण करण्यात आले. त्यात आढळलेल्या ४ मुलांना जवळच्या शाळेत दाखल करून  घेण्यात आले. अनेक कुटुंबे हंगामी कामासाठी ठरावीक काळात जिल्ह्यात येतात. त्यांच्याबरोबर ६ ते १८ वर्षे वयोगटातील मुलेही असतात. सर्वेक्षणात अशी ६३ मुले स्थलांतरित आढळून आली. त्यांनाही शिक्षणाच्या प्रवाहात आणले गेले.  उत्तर प्रदेश, बिहार, गुजरात, कर्नाटक आणि नेपाळच्याही मुलांचा यामध्ये समावेश आहे, तर ४५ मुले रत्नागिरी जिल्ह्यातून अन्य ठिकाणी स्थलांतरित झाली आहेत.

मागील दोन वर्षांचा पट

तालुका        २०२०-२१        २०२१-२२

*  मंडणगड    ३६२५          ३६४२

*  दापोली      ७८४३         ८०५५

*   खेड             ७३९१         ७४१८

*  चिपळूण     ९७९७         ९९८८

*  गुहागर      ७०८४         ७२६४

*  संगमेश्वर    ९२९०         ९५४१

*  रत्नागिरी    ११४४९        ११७८०

*  लांजा       ६६०६         ६६८६

*  राजापूर     ८७२५         ८८५७

एकुण          ७१८१०        ७३२३१

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Students increase in zilla parishad schools due to innovative initiatives zws

ताज्या बातम्या