येथील पटवर्धन हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक यांच्याशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून थेट संवाद साधत ई-लर्निग उपक्रमाचे अभिनव उद्घाटन केले.
कोकणातील शाळकरी मुलांना विविध विषयांचे तज्ज्ञांकडून थेट मार्गदर्शन मिळावे, या उद्देशाने रत्नागिरी-सिंधुदुर्गचे खासदार विनायक राऊत यांनी खास निधी देऊन या दोन जिल्ह्य़ांमधील २८ शाळांमध्ये ई-लर्निगची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. विविध प्रकारचे शैक्षणिक साहित्य तयार करणारी तमिळनाडूची सुंदरम कंपनी आणि बीएसएनएलच्या सहकार्याने हा उपक्रम राबवला जाणार आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक यांच्या उपस्थितीत या उपक्रमाचे औपचारिक उद्घाटन झाले. चिपळूण तालुक्यातील पेढे येथील आर.सी.काळे हायस्कूल, रत्नागिरीचे पटवर्धन हायस्कूल आणि सिंधुदुर्ग जिल्ह्य़ातील कुडाळ हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी याप्रसंगी या दोन मान्यवरांशी थेट संवाद साधला. पटवर्धन हायस्कूलमधील साक्षी कांबळे हिने, कविता करण्याचा छंद कसा जोपासावा, असा प्रश्न मधुभाईंना विचारला असता, भरपूर वाचन आणि निरीक्षणाचा सल्ला त्यांनी दिला. तसेच रत्नागिरीजवळ मालगुंड येथे असलेल्या कवी केशवसूत स्मारकाला भेट देण्याचीही सूचना केली. कुडाळ हायस्कूलच्या विद्यार्थ्यांशी बोलताना कर्णिकांनी, ज्येष्ठ कवी आरती प्रभू तुमच्या शाळेचे माजी विद्यार्थी असल्याचे स्मरण करून दिले. तसेच काळे हायस्कूलच्या विद्यार्थ्यांना दापोली तालुक्यातील पालगडचे साने गुरुजी यांचे ‘श्यामची आई’ या कादंबरीसह इतर साहित्य वाचण्याचे आवाहन केले.
उद्धव ठाकरे आणि कर्णिक मुंबईतील सभागृहातून या तीन शाळांमधील मुलांशी थेट बोलत होते. मुलांसाठी हा एक वेगळा अनुभव होता. उद्धव यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांनी त्यांना शुभेच्छाही दिल्या.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला खासदार राऊत यांनी प्रास्ताविकामध्ये, कोकणातील मुलांना तज्ज्ञ व्यक्तींकडून उत्तम मार्गदर्शन मिळावे म्हणून हा उपक्रम सुरू करत असल्याचे सांगितले. मुंबई महापालिकेच्या शाळांमध्ये शिवसेनेतर्फे हा उपक्रम यशस्वीपणे राबवला जात आहे. तसेच सहकार्य व मार्गदर्शन उद्धव ठाकरे यांनी कोकणातील या उपक्रमाला करावे, अशीही विनंती राऊत यांनी केली. कोकणातील मुलांच्या बुद्धिमत्तेला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड मिळण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वाचा असल्याचे मत उद्धव यांनी याप्रसंगी बोलताना व्यक्त केले. त्यांच्या समवेत रत्नागिरीचे पालकमंत्री रवींद्र वायकर, सिंधुदुर्गचे पालकमंत्री दीपक केसरकर, आमदार राजन साळवी इत्यादी मान्यवर उपस्थित होते.