scorecardresearch

व्यसनमुक्ती जनजागृतीसाठी विद्यार्थी रस्त्यावर उतरले; एस एस निकमच्या विद्यार्थ्यांचे नुक्कड नाटक आकर्षण ठरतंय

समाजातील वाढती व्यसनाधीनता आणि त्यामुळे होणारे दुष्परिणाम याकडे लक्ष केंद्रित करण्याकरिता लोणेरे येथील एस एस निकम हायस्कूलच्या इयत्ता आठवी आणि नववीमधील विद्यार्थ्यांनी तयार केलेले नुक्कड नाटक सध्या सर्वाचे आकर्षण बनले आहे.

व्यसनमुक्ती जनजागृतीसाठी विद्यार्थी रस्त्यावर उतरले; एस एस निकमच्या विद्यार्थ्यांचे नुक्कड नाटक आकर्षण ठरतंय
व्यसनमुक्ती जनजागृतीसाठी विद्यार्थी रस्त्यावर उतरले

अलिबाग : समाजातील वाढती व्यसनाधीनता आणि त्यामुळे होणारे दुष्परिणाम याकडे लक्ष केंद्रित करण्याकरिता लोणेरे येथील एस एस निकम हायस्कूलच्या इयत्ता आठवी आणि नववीमधील विद्यार्थ्यांनी तयार केलेले नुक्कड नाटक सध्या सर्वाचे आकर्षण बनले आहे. सध्या हे नाटक बाजारपेठेत ठिकठिकाणी सादर होत असून त्याला मोठा प्रतिसाद मिळत आहे.

समाजात दिवसेंदिवस वाढत चाललेल्या व्यसनाधीनतेमुळे सामाजिक तसेच कौटुंबिक स्वास्थ्य धोक्यात येत चालले आहे. वाढती गुन्हेगारी आणि कर्करोगामुळे होणारी जीवितहानी टाळायची असेल तर समाज व्यसनमुक्त होणे गरजेचे आहे हा संदेश देण्यासाठी लोणेरे येथील एस एस निकम हायस्कूलमधील इयत्ता आठवी आणि नववीच्या विद्यार्थ्यांनी चक्क रस्त्यावर उतरत पथ नाटय़ करून जनजागृतीची मोहीम हाती घेतली आहे. गोरेगाव बस स्थानकात या विद्यार्थ्यांनी तंबाखू, गुटखा खाल्ल्याने, दारू प्यायल्याने त्याचे कसे विपरीत परिणाम शरीरावरती होतात, कोणते भयंकर रोग होतात त्यातून कसा अंत होऊन कुटुंबाची वाताहत होते याचे सादरीकरण केले. पंधरा मिनिटांच्या या पथ नाटय़ातून आजची पिढी व्यसनाकडे का आकर्षित होते त्यांना रोखणे किती गरजेचे आहे हा संदेशदेखील दिला. हे पथ नाटय़ पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. उपस्थित अनेकांनी या विद्यार्थ्यांवर कौतुकाचा वर्षांव केला.

प्राचार्या दर्शना चावरेकर, प्राध्यापिका प्रियदर्शनी पाटील यांच्या संकल्पनेतून तयार झालेल्या या नुक्कड नाटकात मधुरा गडकरी, सर्वेश गोरेगावकर, वेद शिंदे, नेहा गोरेगावकर, गौरी मेटरकर, ईश्वरी घोसाळकर, वैभव मोहिते, अर्षदा मुरूडकर, कुशल पाटील, ओम गावनरसह वीस विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला आहे. गोरेगाव पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांसह ग्रामस्थांनी या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या