चिपळूण : तालुक्यातील कोळकेवाडी धरणातून पावसाळय़ात सोडण्यात येणाऱ्या पाण्याच्या नियोजनाबाबत उपाययोजना सुचवण्यासाठी अभ्यास गट स्थापन करण्यात आला आहे. शासकीय अधिकाऱ्यांसह नऊ जणांचा या गटामध्ये समावेश आहे. चिपळूण व महाड शहरातील पूरपरिस्थिती संबंधात उपाययोजनांबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली गेल्या वर्षी १५ डिसेंबर रोजी बैठक झाली होती. पावसाळय़ात कोळकेवाडी धरणातून येणाऱ्या अवजलाच्या पाण्यामुळे चिपळूण शहरात पुराची तीव्रता वाढते, असे चिपळूण बचाव समिती सदस्यांनी या बैठकीत नमूद केले होते. त्यामुळे याबाबत वस्तुस्थितीचा अभ्यास करुन उपाययोजना सुचवण्यासाठी निवृत्त मुख्य अभियंता डी. एन. मोडक यांच्या अध्यक्षतेखाली अभ्यास गटाची स्थापना करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत. जलसंपदा विभागाचे निवृत्त मुख्य अभियंता दीपक मोडक यांच्या अध्यक्षतेखालील या गटामध्ये महाजेनकोचे (पोफळी) मुख्य अभियंता संजय चोपडे, रत्नागिरी पाटबंधारे मंडळाच्या अधीक्षक अभियंता वैशाली नारकर, मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे, केएलई इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी (हुबळी) या संस्थेचे स्थापत्य अभियांत्रिकी प्रमुख डॉ. शरद जोशी, चिपळूणचे सामाजिक कार्यकर्ते डॉ. प्रकाश पाटणकर आणि अॅग्रो टुरिझम, चिपळूणचे संजीव अणेराव यांचा सदस्य म्हणून समावेश केला आहे.
कोयना सिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता नितीश पोतदार गटाचे सदस्य सचिव असून रत्नागिरीच्या पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता ज.म.पाटील समन्वयक सचिव म्हणून काम पाहणार आहेत. गेल्या वर्षी जुलै महिन्यात आलेल्या महापुरामध्ये कोयना अवजल विसर्गामुळे चिपळूण शहर व परिसरावर झालेला परिणाम, तसेच त्या कालावधीत कोळकेवाडी धरणातून सोडण्यात आलेल्या विसर्गाच्या परिमाणाचे दृढीकरण व विसर्ग सोडण्याची कारणमीमांसा करणे, कोळकेवाडी अवजलाचा महत्तम विसर्ग, महत्तम भरती पातळीचे वेळी चिपळूण शहर परिसरात होणारा परिणाम, कोळकेवाडी ते वाशिष्ठी नदीच्या वहनक्षमतेबाबत अभ्यास या गटाने करणे अपेक्षित आहे. त्याचबरोबर भविष्यात कोळकेवाडी धरणातून सोडावयाच्या अवजलाबाबत प्रमाणित कार्यपध्दती सुचवण्याचीही जबाबदारी सोपवण्यात आली आहे.



