वैजापूर येथील जलसंधारण कार्यालयातील उपविभागीय अधिकाऱ्यास साडे आठ लाख रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सोमवारी सायंकाळी पकडले. या माहितीला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधीक्षक संदीप अटोळे यांनी दुजोरा दिला आहे. हृषिकेश देशमुख, असे लाच घेतलेल्या उपविभागीय अधिकाऱ्याचे नाव आहे.
हेही वाचा- कराडजवळ महामार्गाचे तब्बल १४ पदर बनणार; वाहतूक कोंडी कायमची दूर करण्याचे मोठे नियोजन
देशमुख यांच्याकडे औरंगाबाद जलसंधारण विभागाचाही अतिरिक्त कार्यभार होता. एका कंत्राटदाराचे देयके काढण्यासाठी साडेसात टक्क्यांनी लाच म्हणून आठ लाख ५३ हजार २५० रुपये देशमुख याने मागितली. त्यासंदर्भातील तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे करण्यात आली. त्यानुसार आैरंगाबाद येथील जलसंधारण कार्यालयात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रचला. तक्रारदाराकडून मागितलेल्या लाचेची रक्कम स्वीकारताना हृषिकेश देशमुख यांना पकडण्यात आले. देशमुख यांना पथकाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात चौकशीसाठी नेण्यात आले. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.