मुख्यमंत्री ममता बॅनर्जी मुंबईत आल्यानंतर महाराष्ट्रातील उद्योग पश्चिम बंगालमध्ये पळविणार का? असा प्रश्न भाजप नेते आशिष शेलार यांनी केला होता. याला राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. वर्षभरापूर्वी मुंबईत आलेल्या योगी आदित्यनाथ यांचा त्यावेळेस निषेध का केला नाही? एवढेच नव्हे तर आज गुजरातचे मुख्यमंत्री आज मुंबईत आहेत, याचा निषेध आमदार आशिष शेलार कधी करणार आहेत, याची आम्ही वाट पाहतोय, असेही देसाई म्हणाले.

उद्योगमंत्री देसाई यांनी आज मंत्रालयातील दालनात पत्रकारांशी संवाद साधताना भाजपावर जोरदार टीकास्र सोडले. ते म्हणाले की, उद्योग वाढीसाठी आम्ही इतर राज्यात जात नाही किंवा पळवापळवी करत नाही तर परदेशात जातो. गुंतवणूक वाढवितो. उद्योग पळविण्यावर आमचा विश्वास नाही. जेव्हा सर्व अर्थव्यवस्था ठप्प होती, तेव्हा महाष्ट्रातील उद्योग थांबू दिला नाही. ६० देशांसोबत कोट्यवधींचे सामंजस्य करार केले. नुकतेच दुबई येथील एक्सोमध्ये १५ हजार कोटींचे करार केले. अनेकांना सुविधा दिल्या आहेत. महाराष्ट्र उद्योगांना आकर्षित करते.

भाजप नेते आशिष शेलार यांनी महाराष्ट्राबदद्ल शंका घेण्याचे कारण नाही. भाजपाशासित राज्यातील मुख्यमंत्री आल्यानंतर त्यांचा देखील निषेध करावा, असेही देसाई म्हणाले. आदित्य ठाकरे व ममता बॅनर्जी यांच्यात झालेल्या बैठकीबाबत शेलार यांनी केलेले वक्तव्य विसंगती दर्शविणारे आहे. दोघांमध्ये राजकीय चर्चा झाली असेल. परंतु भाजपाची खरी पोटदुखी वेगळी आहे. सध्या भाजपा सर्व पातळींवर मागे पडत आहे. प्रादेशिक पक्ष पुढे जातील, या भीतीमधून असे वक्तव्य केले जात असल्याचे देसाई म्हणाले.