राज्याचे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांचा सोलापुरात मध्यवर्ती ठिकाणी असलेला बंगला हा बेकायदेशीरच आहे, असा अहवाल महापालिका आयुक्तांनी दिला आहे. सोलापुरातील त्याच्या या बंगल्यावरून गेले काही दिवस वाद सुरु होता. मात्र आता महापालिकेच्या अहवालात हा बंगला वादग्रस्त असल्याचे म्हटले असल्यामुळे वादग्रस्त बंगल्याच्या बांधकाम प्रकरणी देशमुख अडचणीत येण्याची चिन्हे आहेत.

सुभाष देशमुख यांचा बंगला हा सोलापुरातील मध्यवर्ती भागात आहे. त्यांचा हा बंगला आरक्षित जागेवर बांधण्यात आला असल्याचा आरोप गेल्या काही दिवसांपासून करण्यात येत होता. मात्र हा बंगला ज्या जमिनीवर बांधण्यात आला आहे, ती जमीन पालिकेच्या अग्नीशमन विभाग आणि व्यापारी गाळ्यांसाठी आरक्षित आहे, असे अहवालात म्हंटले आहे. तसेच, हा २६ पानी अहवाल मुंबई उच्च न्यायालयात सादर करण्यात आला आहे. या अहवालात सुभाष देशमुख यांच्या बंगल्याच्या बांधकामावर अनेक आक्षेप नोंदवण्यात आले आहेत.

या संपूर्ण प्रकरणामुळे भाजपचा आणखी एक त्री वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. दरम्यान, हा अहवाल देऊन सोलापूर महापालिकेचे आयुक्त अविनाश ढाकणे हे रजेवर गेले असल्याचे समजते. मात्र महापालिकेने हा अहवाल दिल्यामुळे त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले असल्याची चर्चा आहे.