वाई : लडाख येथे लष्कराचे वाहन नदीत कोसळून झालेल्या अपघातात साताऱ्यातील खटावचे सुभेदार विजय शिंदे यांना वीरमरण आले. २६ सैनिकांना घेऊन जाणारे भारतीय लष्कराचे वाहन श्योक नदीत पडले. या अपघातात सात जवानांचा मृत्यू झाला. त्यामध्ये साताऱ्यातील विसापूर (ता. खटाव) येथील सुभेदार विजय सर्जेराव शिंदे यांचा समावेश आहे. देशसेवा बजावत असताना त्यांना वीरमरण आले. या घटनेमुळे विसापूरसह खटाव तालुका शोकसागरात बुडाला आहे. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुली, दोन भाऊ असा परिवार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

विजय सर्जेराव शिंदे हे सन १९९८ मध्ये २२ मराठा लाईट इन्फंट्रीमध्ये लष्करी सेवेत रुजू झाले होते. २४ वर्षाच्या कालावधीत त्यांनी लष्करात विविध ठिकाणी काम करून देशाचे संरक्षण केले. विसापूर गावाला सैनिकी परंपरा आहे. विजय शिंदे यांचे वडील सर्जेराव शिंदे लष्करात होते, तर मोठे बंधू प्रमोद शिंदे हे लष्करात पॅरा कमांडो म्हणून कार्यरत आहेत.

सध्या विजय शिंदे यांचे पोस्टिंग लेह लडाख येथे होते. लष्करात ते सुभेदार या पदावर कार्यरत होते. २६ जवानांचे परतापूरच्या संक्रमण शिबिरातून उपसेक्टर हनिफच्या फॉरवर्डकडे जात असताना आज सकाळी ९ वाजताच्या सुमारास लष्कराचे वाहन श्योक नदीत पडले. या अपघातात सात सैनिकांचा मृत्यू झाला आणि १६ जण जखमी झाले असल्याची माहिती मिळत आहे. त्याच अपघातात सुभेदार विजय शिंदे यांना वीरमरण आले.

हेही वाचा : लडाखमध्ये जवानांच्या गाडीला भीषण अपघात; ७ जवानांचा मृत्यू

विजय शिंदे यांचे पार्थिव रविवारी (२९ मे) विसापूर (ता. खटाव) येथे आणले जाणार आहे. तिथेच शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Subhedar vijay shinde from khatav satara martyr in ladakh pbs
First published on: 27-05-2022 at 21:55 IST