उस्मानाबाद : जिल्ह्यातील करोनाबाधित गर्भवती महिलांना विलगीकरण कक्षात ठेवून त्यांची प्रसूती यशस्वीरीत्या जिल्हा शासकीय स्त्री रुग्णालय व आयुर्वेद महाविद्यालयातील डॉक्टरांनी पार पाडली. काही महिलांची शस्त्रक्रिया करून प्रसूती झाली असली तरी माता आणि बालकांच्या सुरक्षिततेची खबरदारी घेण्यात आली आहे. करोना काळात ५७ महिलांची प्रसूती करण्यात आली असून माता आणि बालक सुरक्षित आहे.

उस्मानाबाद येथील शासकीय स्त्री रुग्णालयात प्रसूतीसाठी येणाऱ्या करोनाबाधित महिलांची व्यवस्था आयुर्वेद महाविद्यालयातील विलगीकरण कक्षात करण्यात आली होती. तेथे गर्भवती महिलांची शस्त्रक्रियेने (सिझर) प्रसूती तसेच नियमानुसार गर्भपात करण्याची व्यवस्थाही करण्यात आली आहे. याच केंद्रात शनिवारी जिल्हा स्त्री रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षक डॉ. स्मिता सरोदे-गवळी यांच्या नेतृत्वाखाली करोनाबाधित महिलेची यशस्वीपणे शस्त्रक्रिया करून प्रसूती करण्यात आली.

कोविडच्या काळात ५७ करोनाबाधित गर्भवती महिलांपैकी काही महिलांची प्रसूती करण्याचे आणि उर्वरित महिलांना योग्य स्वरूपात वैद्यकीय सुविधा देण्याचे काम येथील स्त्री रुग्णालयातील डॉक्टरांनी जिकिरीने पार पाडले आहे. यामध्ये शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. खापर्डे, स्त्री रोग विभागप्रमुख डॉ. विना पाटील, डॉ. खोत, डॉ. आगवणे आणि निवासी डॉक्टरांनी सहकार्य केले.

तीन किलो वजनाच्या बाळाचा जन्म

शस्त्रक्रिया झालेल्या करोनाबाधित महिलेने शनिवारी तीन किलो वजन असलेल्या गोंडस मुलास जन्म दिला आहे. या बाळाची ‘आरटीपीसीआर’ चाचणी करण्यात आली. ती नकारात्मक आली. सध्या या महिलेची व बाळांची प्रकृती चांगली आहे. या महिलेची यापूर्वी दोनवेळा प्रसूतीसाठी शस्त्रक्रिया करून झाल्या होत्या. त्यामुळे यावेळची शस्त्रक्रिया अतिशय जोखमीची होती, अशीही माहिती डॉ. स्मिा सरोदे—गवळी यांनी दिली.