scorecardresearch

शुद्ध पाण्यासाठी सौरऊर्जा संयंत्राचा प्रयोग यशस्वी; रायसोनी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे संशोधन

सध्या पारंपरिक ऊर्जा स्त्रोताच्या तुटवडय़ामुळे आणि जास्त मागणीमुळे ऊर्जेच्या किंमतीत दिवसेंदिवस वाढ होत आहे

जळगावच्या रायसोनी महाविद्यालयातील विद्युत विभागातील विद्यार्थ्यांनी तयार केलेले सौरऊर्जेवरील शुद्धजल संयंत्र.

जळगाव : जलशुद्धीकरण प्रकल्पात प्रदूषण टाळून पिण्यायोग्य शुद्ध पाणी मिळविण्यासाठी सौर ऊर्जा हा पर्याय येथील जी. एच. रायसोनी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी शोधून काढला आहे. हजारोंचे वीज देयक वाचविण्यासाठी जल संयंत्र निर्मितीचा प्रयोग विद्यार्थ्यांनी यशस्वी करून दाखविला आहे. विशेष म्हणजे, या यंत्राची समुद्राचे खारे पाणी गोड करण्याची क्षमता आहे.

महाविद्यालयाच्या विद्युत विभागातील प्रसाद पाटील, कुणाल सोनिग्रा, मंगेश मोहोरकर, मंथन ईशी, प्रतीक चौधरी या विद्यार्थ्यांनी विजेवर चालणाऱ्या जलशुद्धीकरण यंत्रणेवर यशस्वी उपाय शोधला आहे. त्यांनी सौर ऊर्जेवरील स्वयंचलित संयंत्र बनविले आहे. घरातील जलशुद्धीकरण यंत्राद्वारे (वॉटर फ्युरिफायर) शुद्ध पाण्यासाठी महिनाभरात किमान शंभरपेक्षा अधिक युनिट वीज खर्ची होते. हा खर्च वाचविण्यासाठी सौर ऊर्जेचा वापर करणे शक्य झाले आहे.

सध्या पारंपरिक ऊर्जा स्त्रोताच्या तुटवडय़ामुळे आणि जास्त मागणीमुळे ऊर्जेच्या किंमतीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यास पर्यायी ऊर्जा म्हणून सौर ऊर्जा हे एक उत्तम माध्यम सर्वासमोर आहे. त्याआधारे सौर ऊर्जेवरील स्वयंचलित जलशुद्धीकरण प्रकल्प तयार केल्याचे विद्यार्थी सांगतात. विद्युत विभाग प्रमुख बिपासा पात्रा, प्रा. मनीष महाले यांचे त्यांना मार्गदर्शन लाभले.

संस्थेच्या संचालक प्रीतम रायसोनी, संचालिका प्रा. डॉ. प्रीती अग्रवाल, प्रा. डॉ. प्रणव चरखा यांनी प्रोत्साहन दिले.

दुर्गम भागात तसेच समुद्र किनाऱ्यावर पिण्यायोग्य शुद्ध पाणी मिळविण्यासाठी या सौर शुद्धजल संयंत्राचा वापर करता येतो. हे यंत्र सौर ऊर्जेवर चालते. त्यामुळे प्रदूषण होत नाही. या संयंत्रासाठी खर्चही कमी येत असल्याने स्वयं रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊ शकतात. समुद्राच्या खाऱ्या, मचुळ पाण्याचे तसेच अशुद्ध पाण्याचे गोडय़ा पाण्यात, शुद्ध पाण्यात रूपांतर करण्यासाठी या सौर शुद्धजल संयंत्राचा उपयोग होऊ शकतो. सौर शुद्धजल यंत्रणेद्वारे मोठय़ा प्रमाणावर गोडय़ा पाण्याची सोय केली जाऊ शकते, असे प्रा. मनीष महाले यांनी सांगितले.

कार्यप्रणालीवर परिणाम करणारे घटक

सौर शुद्धजल संयंत्राची कार्यक्षमता सौर किरणांवर अवलंबून असते. शुद्ध जलाची निर्मिती ही सौरऊर्जेच्या उपलब्धतेवर अवलंबून असते. जर सौर किरणांची तीव्रता जास्त असेल, तर सौर शुद्धजल संयंत्राची उत्पादन क्षमता वाढते. वातावरणामध्ये वाऱ्याची गती जशी वाढत जाते, त्याप्रमाणे शुद्धजल संयंत्रातील उष्णतामान कमी होते. वाऱ्याची गती कमी असेल, तर संयंत्रापासून जास्त प्रमाणात शुद्धजल प्राप्त होते. तापमान जसजसे वाढत जाते, त्या प्रमाणात सौर शुद्धजल संयंत्राची उत्पादन क्षमता वाढत जाते. संयंत्रामधील गढूळ पाण्याची पातळी जास्त असेल, तर आतील पाण्याचे तापमान कमी राहते. त्यामुळे संयंत्राची उत्पादन क्षमता कमी होते. उत्पादन क्षमता वाढविण्यासाठी पाण्याची पातळी कमीत कमी ठेवणे आवश्यक आहे.

वैशिष्टय़े

या सौर शुद्ध जल संयंत्राद्वारे दररोज दोन ते अडीच लिटर शुद्ध पाणी मिळते. हे संयंत्र वापरण्याकरिता पारंपरिक विद्युत ऊर्जेची आवश्यकता नाही. त्याच्या वापरामुळे पर्यावरणाची कोणत्याही प्रकारची हानी होत नाही.

प्रकल्पाचे फायदे

कोणत्याही प्रकारच्या (विद्युत) खर्चीक ऊर्जेची गरज भासत नाही. गढूळ, मचूळ पाण्याचे रूपांतर शुद्धजलामध्ये करता येऊ शकते. या संयंत्रामध्ये कोणताही गंजणारा भाग नसून वापरण्यास अत्यंत सोपे आहे. दुर्गम भागात तसेच समुद्र किनाऱ्यावर पिण्यायोग्य शुद्ध पाणी मिळविता येते. कोणतेही प्रदूषण होत नसून स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध होऊ शकतात.

संयंत्रामधील काचेचा उतार

संयंत्रातील वरील बाजूस असलेल्या काचेचा उतार कमीत कमी असेल, तर उत्पादन क्षमता जास्त असते; परंतु काचेचा उतार जर जास्त असेल, तर पाण्याचे थेंब संयंत्राच्या संकलन वाहिनीत न जाता संयंत्रामध्येच पडतात. त्यामुळे काचेच्या उताराचा कोन २०-३० अंशांमध्ये असावा, असे विद्यार्थी सांगतात.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Successful experiment of solar power plant for pure water zws

ताज्या बातम्या