मुंबई : सोयाबीनच्या (Soybean) काढणीपासून जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत प्रति क्विंटल ४,००० ते ४,७०० रुपयांवर असलेले दर (Price) फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात ५,७०० रुपयांपर्यंत पोहचले आहेत. शेतकऱ्यांकडील सोयाबीन संपल्यानंतर दरवाढ झाल्यामुळे या दरवाढीचा शेतकऱ्यांना काहीच फायदा होणार नाही. मात्र, साठेबाजी करणाऱ्या व्यापाऱ्यांचे उखळ पांढरे होणार आहे.
यंदाच्या हंगामात सोयाबीन काढणीनंतर सरासरी दर ४,००० ते ४,७०० रुपयांपर्यंत होते. अतिवृष्टी, अवकाळीमुळे अगोदरच उत्पादनात घट झाली होती. त्यात ५३२८ रुपये हमीभाव असतानाही सरकारी खरेदी संथगतीने सुरू होती. त्यामुळे नाईलाजाने शेतकऱ्यांना प्रति क्विंटल ४०० ते ५०० रुपये तोटा सहन करून सोयाबीन विकावे लागले. बहुतेक शेतकऱ्यांनी आपल्याकडील सोयाबीन विकल्यानंतर आता दरात वाढ झाली आहे. सध्या सरासरी दर्जाच्या सोयाबीनचे दर ५,००० ते ५,७०० प्रति क्विंटलपर्यंत आहेत, बियाणांसाठीच्या दर्जेदार सोयाबीनचे दर ६,५०० रुपये प्रति क्विंटलपर्यंत गेले आहेत.
सोयाबीन उत्पादनाबाबत संभ्रम
महाराष्ट्र, मध्य प्रदेश ही प्रमुख सोयाबीन उत्पादक राज्ये आहेत. यंदा देशात सरासरी १५२.६८ लाख टन सोयाबीन उत्पादनाचा अंदाज केंद्रीय कृषी मंत्रालयाने व्यक्त केला होता. पण, अवकाळी पाऊस, अतिवृष्टीमुळे उत्पादनात घट झाली आहे. सोयाबीन प्रोसेसर्स असोसिएशन ऑफ इंडियाने (सोपा) देशाचे उत्पादन १०५ लाख टनांपर्यंत स्थिरावेल, असे म्हटले आहे. त्यामुळे देशाचे एकूण सोयाबीन उत्पादन किती, असा संभ्रम निर्माण झाला आहे. दरम्यान, हमीभाव खरेदीलाही फारसा प्रतिसाद मिळाल्याचे दिसत नाही. मध्य प्रदेशात भावांतर योजनेतून १७ लाख टन तर महाराष्ट्रात हमीभाव खरेदीतून सुमारे सात लाख टन सोयाबीनची खरेदी झाली आहे.
सोयापेंडीच्या निर्यात वृद्धीमुळे दरवाढ
सोयाबीनचे तेल काढून झाल्यानंतर उर्वरीत सोयापेंडीला देशांतर्गत पशुपालन, कुक्कुटपालन उद्योगातून चांगली मागणी असते. यंदा चिकन आणि अंड्याचे दर टिकून राहिल्यामुळे कुक्कुटपालन उद्योगातून असणारी मागणी टिकून राहिली आहे. उत्पादन घटीमुळे सोयापेंडीच्या उत्पादनातही घट झाली आहे. गतवर्षी देशात ९१ लाख टन सोयापेंड उत्पादन झाले होते. यंदा ७७ लाख टनांपर्यंत खाली येण्याची शक्यता आहे. दुसरीकडे ऑक्टोबर – नोव्हेंबर महिन्यात सोयापेंडीच्या निर्यातीत वाढ झाल्यामुळे पेंडीच्या दरातही वाढ झाली आहे. निर्यात अशीच सुरू राहिल्यास दर टिकून राहण्याची शक्यता आहे.
तज्जांचे मत काय ?
सोयाबीन उत्पादनातील घट, सोयापेंडीची निर्यातवृद्धी आणि डॉलरच्या तुलनेत ढासळलेला रुपया, या प्रमुख कारणांमुळे सोयाबीनचे दरात तेजी येऊन ५,७०० रुपये क्विटलपर्यंत दर गेले आहेत. आता शेतकऱ्यांकडील सोयाबीन संपले आहे. त्यामुळे दरवाढीचा फायदा शेतकऱ्यांना होणार नाही. सोयापेंडीची निर्यात सुरू राहिल्यास दर ५,००० रुपये प्रति क्टिंलवर टिकून राहतील, अशी माहिती शेतीमालाच्या बाजारभावाचे अभ्यासक श्रीकांत कुवळेकर यांनी दिली.

