अलिबाग- राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे नाराज असल्याच्या चर्चांना आहेत. दोन दिवसांपासून घारे हे संपर्क क्षेत्राबाहेर आहेत. त्यामुळे तर्कवितर्कांना ऊत आला आहे.

कर्जत खालापूर विधानसभा मतदार संघातून बंडखोरी करत शिवसेना शिंदे गटाविरोधात विरोधात निवडणूक लढविणारे आणि नगर पालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूकीत शिवसेना शिंदे गटाला धोबीपछाड देणारे सुधाकर घारे गेल्या दोन दिवसांपासून संपर्कक्षेत्राबाहेर आहेत. ते कुठे आहेत, त्यांचा फोन का बंद आहे याचा खुलासा होऊ शकलेला नाही. त्यामुळे कर्जत खालापूर मतदार संघात राजकीय वर्तूळात उलटसूलट चर्चांना ऊत आला आहे.

जिल्हा परिषद निवडणुकीनंतर जिल्ह्यातील राजकीय समिकरणे पुन्हा बदलली आहेत. शिवसेना शिंदे गटाशी जुळवून घेण्याचे धोरण भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षनेतृत्वाने घेतले आहे. त्यामुळे जिल्हाध्यक्ष घारे यांची मोठी अडचण झाली आहे. विधानसभा निवडणूकीत घारे यांनी बंडखोरी करत शिवसेना शिंदे गटाच्या महेंद्र थोरवे यांच्या विरोधात निवडणूक लढविली होती. अटीतटीच्या लढतीत घारे यांचा पराभव झाला होता. निवडणुकीनंतर घारे यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली. या संधीचा फायदा घेऊन घारे यांनी कर्जत खालापूर मतदारसंघात संघटनात्मक बांधणी मजबूत केली. शिवसेना शिंदे गट आणि भाजप विरोधात जाऊन त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका लढविल्या. शिवसेना ठाकरे गटाला सोबत घेऊन लक्षवेधी यश संपादीत केले. कर्जत नगरपालिका शिवसेना भाजप युतीकडून ताब्यात घेतली. कर्जत पंचायत समित जिंकली. विधानसभा मतदारसंघातील बहुतांश जिल्हा परिषद सदस्य निवडून आणले. ज्यामुळे कर्जत खालापूर मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाची चांगलीच कोंडी झाली होती. आमदार महेंद्र थोरवे यांना घारे यांच्या समोर मोठे आव्हान निर्माण केले होते. मात्र रायगड जिल्हा परिषदेवर सत्ता स्थापनेत शेवटच्या क्षणी शिवसेना शिंदे गटाला सामावून घेण्याचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपच्या पक्षनेतृत्वाने घेतला. हा निर्णय घेतांना स्थानिक कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेतल्या गेल्या नाहीत. त्यामुळे घारे त्यांच्या साथीदारांची राजकीय कोंडी झाली आहे.

ज्या शिवसेना शिंदे गटासोबत लढा दिला. टोकाचा संघर्ष केला. त्याच्याशी जुळवून घ्यायचे तरी कसे असा प्रश्न घारे आणि त्यांच्या सहकाऱ्यांना पडला आहे. या नाराजीतूनच घारे संपर्कक्षेत्राबाहेर गेल्याची चर्चा आहे. दरम्यान या नाराजीबाबत घारे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, त्यांचा फोन बंद असल्याचे सांगितले जात आहे.