मुंबई : राज्याच्या राजकारणात ठसा उमटविण्याबरोबरच ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’चा मूलमंत्र देत जलसंधारणाची मोठी चळवळ उभारणारे काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांच्या जन्मदिनी म्हणजे २१ ऑगस्टला यापुढे राज्याचा जलसंधारण दिन साजरा केला जाणार आहे. विशेष म्हणजे यात तरूणांना सहभागी करून घेतले जाणार असून, एरवी प्रत्येक सरकारी कार्यक्रमात सक्तीच्या असलेल्या ‘सेल्फी’ऐवजी एक लाख ‘रिल्स’ बनविण्याचे आवाहन तरूणांना करण्यात आले आहे.

नाईक यांनी जलसंधारणाच्या क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे मृद व जलसंधारण विभागाने काढलेल्या आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. सुधाकरराव नाईक यांनी राज्यातील खालावलेली भूजल पातळी आणि पाणीटंचाईवर उपाय म्हणून मोठ्या धरणांना प्राधान्य देण्याऐवजी पाणलोट क्षेत्राचा विकास करत भूजल पुनर्भरणावर भर दिला.

मृद आणि जलसंधारण हे शेती, पर्यावरण, व शाश्वत विकासाचा पाया आहे. त्याचे भविष्यातील पिढीकरिता रक्षण करण्याकरिता १५ ते २१ ऑगस्ट दरम्यान जलसंधारण सप्ताह आणि १५ ऑगस्ट ते २६ जानेवारी, २०२७ दरम्यान जलसंधारण अभियान आयोजिण्यात आले आहे. या कार्यक्रमाचा भाग म्हणून २१ ऑगस्टला राज्यातील सर्व ३६ जिल्ह्यांत ‘महा वॉकेथॉन–वॉक फॉर वॉटर’चे आयोजन करण्यात येणार आहे.

‘पाणी अडवा, पाणी जिरवा, जलयुक्त महाराष्ट्र घडवा’ या घोषवाक्याखाली हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. प्रत्येक जिल्ह्यात किमान १० ते १५ हजार नागरिक सहभागी होतील, असे नियोजन करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. शालेय-महाविद्यालयीन विद्यार्थी, अधिकारी-कर्मचारी, स्वयंसेवी संस्था, खेळाडू, उद्योजक आणि सामाजिक संस्थांचा सहभाग घेतला जाईल. कमाल तीन किलोमीटरची ही वॉकेथॉन २१ ऑगस्ट रोजी सकाळी सात वाजता सुरू होईल. सहभागी नागरिकांना जलसंधारणाची शपथ देण्याबरोबरच ‘मी जलदूत’ बॅज, टी-शर्ट व कॅप देण्यात येणार आहेत.

एक लाख युवक–एक लाख रील्स

१५ ते २१ ऑगस्टदरम्यान १५ ते ३० वर्षे वयोगटातील युवकांसाठी ‘रील्स फॉर सॉइल अॅण्ड वॉटर’ स्पर्धा घेण्यात येणार आहे. माती व जलसंधारण, पाणी बचत, पावसाच्या पाण्याचे संकलन, शेततळी, बंधारे आणि वृक्षारोपण यांसारख्या विषयांवर ३० ते ६० सेकंदांच्या रील्स तयार करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ‘एक लाख युवक–एक लाख रील्स’ अशी डिजिटल लोकचळवळ उभारण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

याशिवाय १५ ऑगस्ट ते २६ जानेवारीदरम्यान शाळा-महाविद्यालयांत ‘एक शाळा–एक शोषखड्डा’, निबंध, चित्रकला, पोस्टर आणि वादविवाद स्पर्धा घेण्यात येणार आहेत. ग्रामीण आणि शहरी भागात जलसंधारणाच्या कामांचे भूमिपूजन, लोकार्पण व जलपूजन तसेच लोकसहभागातून जलस्रोतांच्या स्वच्छतेचे उपक्रमही राबविण्यात येणार आहेत.