विधानसभा अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी अध्यक्षपदाची निवडणूक घेण्यात आली. यामध्ये भाजपाचे उमेदवार राहुल नार्वेकर यांचा बहुमताने विजय झाला. नार्वेकर यांची अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर मुख्यंमंत्री एकनाथ शिंदेसोबत अनेक महाविकास आघाडीच्या अधिकाऱ्यांनी अभिनंदन प्रस्ताव सादर केला. नार्वेकरांच्या अभिनंदन प्रस्वावर बोलताना मुनगंटीवार यांनी अजित पवारांना टोला लगावला.

अध्यक्षांच्या निवडीवर अभिनंदन प्रस्ताव सादर करताना टोला

“एकनाथ शिंदेंनी अजितदादांच्या कानात नाही सांगितलं ती त्यांची चूक होती. पण तुम्हाला भविष्यात मुख्यमंत्री बनावं, असं कधी वाटलं तर आमच्या कानात मात्र नक्की सांगा. जयंत पाटलांच्या कानात कधीच सांगू नका, तिथे सांगाल तर धोका आहे. इच्छा होईल तेव्हा फक्त कानात सांगा”. असा टोला भाजपा नेते सुधीर मुनगंटीवारांनी अजित पवारांनी लगावला आहे.

काय म्हणाले होते अजित पवार?

विधानसभा अध्यक्षपदी राहुल नार्वेकर यांची निवड झाल्यानंतर त्यांचं अभिनंदन करताना अजित पवारांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टोलेबाजी केली होती. अजित पवार म्हणाले की, “एकनाथ शिंदेंनी माझ्या कानात सांगितलं असतं की अडीच वर्ष झालीत, आता मला मुख्यमंत्री बनायचं आहे. तर मी नक्कीच उद्धव ठाकरेंशी बोललो असतो”. आम्हाला काहीच प्रॉब्लेम नव्हता असं अजित पवार म्हणाले होते. तसेच पवारांनी विधानभवनात उपस्थित असलेल्या आदित्य ठाकरेंना काय आदित्य तुम्हाला काही प्रॉब्लेम नव्हता ना? अशी विचारणा केली होती. त्यानंतर सभागृहात एकच हशा पिकला होता.

नार्वेकर आदित्य ठाकरेंच्या गुरुस्थानी

राहुल नार्वेकर आदित्य ठाकरेंच्या गुरुस्थानी आहेत. नार्वेकरांनी आदित्य ठाकरे यांना शिकवलंय त्यामुळे आदित्य ठाकरे नार्वेकरांना गुरुदक्षिणा नक्की देतील. शिवसेनेत अजून काही उरलेत ते गुरुदक्षिण म्हणून मिळेल, असा टोलाही मुनगंटीवारांनी आदित्य ठाकरेंना लगावला.