भाजपाचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर हल्लाबोल केलाय. नाना पटोले यांनी मोदींबद्दल जे उद्घार काढले आणि नंतर जी सारवासारव केली हा एक राजकीय तमाशा असल्याचा आरोप मुनगंटीवार यांनी केला. तसेच पटोले जे बोलतात ती एक हास्यजत्रा आहे. म्हणूनच त्यांना आता महाराष्ट्राचे पप्पू म्हणून नामाभिमान दिलंय, असंही मत सुधीर मुनगंटीवर यांनी व्यक्त केलं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सुधीर मुनगंटीवार म्हणाले, “नाना पटोले यांना विस्मरण होण्याचा एक आजार झालाय. त्यांची मागच्या १० वर्षातील काँग्रेसबाबतचं भाष्य ऐकलं तर तीही एक हास्यजत्रा होईल. काँग्रेसबद्दल ते काय बोलायचे, काँग्रेसविषयी ते किती वाईट बोलायचे, सोनिया गांधींविषयी ते कसे बोलायचे याचे त्यांचे १० वर्षाचे रेकॉर्ड आहेत. ते विधानसभेत देखील काँग्रेसबद्दल अतिशय निम्न शब्दात बोलले आहेत. म्हणून ते काय बोलतात ही एक हास्यजत्रा आहे. म्हणूनच त्यांना आता महाराष्ट्राचे पप्पू म्हणून नामाभिमान दिलाय.”

“नाना पटोले यांच्या बुद्धीला गंज चढलाय”

“नाना पटोले यांच्या बुद्धीला गंज चढलाय. सत्तेच्या मोहात जेव्हा पक्ष वाढत नाही तेव्हा अशा पद्धतीचं भाष्य करणं, केंद्र सरकारबद्दल भाष्य केलं जातंय. आपल्या राज्यात आपल्यावर असलेली जबाबदारी विसरायची आणि येता-जाता प्रत्येक गोष्टीला केंद्र कसं जबाबदार आहे अशी बेजबाबदार विधानं करायची हा एक नवीन छंद आमच्या नाना भाऊंना जडला आहे,” असं सुधीर मुनगंटीवार म्हटले.

हेही वाचा : ज्याची बायको पळून जाते त्याचं नाव मोदी वक्तव्यावर नाना पटोलेंचं स्पष्टीकरण; म्हणाले, “बेटी बचाव बेटी पटाव म्हणणाऱ्यांचे…”

“नाना पटोले यांनी ज्या पद्धतीने मोदींबद्दल उद्गार काढले आणि नंतर जी सारवासारव केली हा एक राजकीय तमाशा आहे. यातून महाराष्ट्राच्या पप्पूने जन्म घेतलाय, असं वाटावं अशी त्यांची कृती आहे,” असंही मुनगंटीवार यांनी सांगितलं.

“ज्याची बायको पळते, त्याचं नाव मोदी ठरतं”

दरम्यान, भाजपा नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी नाना पटोले यांच्यावर हायकमांडने झापल्यावर गावगुंड समोर आणला असा आरोप केला. यावर बोलताना नाना पटोले म्हणाले, “गावगुंडाला गावगुंड दिसणार आहे. ते आता त्यांना दिसतच आहे. त्यांची कशी अवस्था झालीय हे सर्वांना माहिती आहे. लोकं भाजपावाल्यांवर हसत आहेत. ज्याची बायको पळते, त्याचं नाव मोदी ठरतं. असं झाल्यानंतर काय बाकी राहिलं आहे.”

हेही वाचा : “नाना पटोले हे ‘मिस्टर नटवरलाल’च्या भूमिकेत आहेत”; बावनकुळेंनी साधला निशाणा

“भाजपाला बेरोजगारी, शेतकऱ्यांचे प्रश्न, छोट्या उद्योजकांचे प्रश्न, गरिबांचे प्रश्न यासाठी निवडून दिलंय. त्यावर त्यांनी लक्ष द्यावं,” असा सल्ला नाना पटोले यांनी भाजपाला दिला. भाजपाने पटोलेंवर पंतप्रधान मोदींच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप केला. यावर बोलताना पटोले म्हणाले, “आम्ही महात्मा गांधींच्या विचाराची लोकं आहोत. त्यामुळे हे विचार काँग्रेसच्या मनात कधी येऊ शकत नाही. ते विचार त्यांच्याच डोक्यात येऊ शकतात.”

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sudhir mungantiwar criticize nana patole over remark on modi pbs
First published on: 24-01-2022 at 11:29 IST