शिवसेनेचे मुखपत्र ‘सामना’तून भाजपाच्या ‘ऑपरेशन कमळ’वर जोरदार टीका करण्यात आली. अल-कायदा या दहशतवादी संघटनेप्रमाणेच भाजपाच्या ऑपरेशन कमळची भीती वाटते, असं खोचक वक्तव्य सामनात करण्यात आलंय. यावर बोलताना भाजपाचा नेते व मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सामनावर जोरदार हल्ला चढवला. सामना वर्तमानपत्र नसून एका पक्षाचं पॅम्प्लेट आहे, अशी टीका मुनगंटीवार यांनी केली. ते शुक्रवारी (२६ ऑगस्ट) नागपूरमध्ये पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देत होते.

सुधीर मुनंगटीवार म्हणाले, “सामना वर्तमानपत्र नसून एका पक्षाचं पॅम्प्लेट आहे. त्या पॅम्प्लेटमध्ये जनतेचे प्रश्न सोडवण्याऐवजी केवळ राजकीय टीका केली जाते. गेले अडीच वर्षे बघितलं तर या वर्तमानपत्रात जनतेचे प्रश्न मांडले गेले नाही. त्यासाठी या पॅम्प्लेटचा उपयोग झाला नाही.”

“स्विझर्लंड सरकारला शेतकऱ्यांच्या भावना कळतात, केंद्र सरकारला का नाही?”

“यवतमाळमध्ये रासायनिक फवारणीमुळे २३ शेतकऱ्यांचा मृत्यू झाला होता. अद्यापही त्या कंपन्यांवर कारवाई झालेली नाही. स्विझर्लंड सरकार यवतमाळच्या शेतकऱ्यांच्या वतीने तो खटला लढत आहे. तसेच सगळ्या शेतकऱ्यांचा खर्च स्विझर्लंड सरकार उचलणार आहे. स्विझर्लंड सरकारला शेतकऱ्यांच्या भावना कळतात, केंद्र सरकारला का कळत नाही?” असा प्रश्न पत्रकाराने विचारला.

“या शेतकऱ्यांच्या मृत्यूच्या घटना यावर्षीच्या नाहीत”

या प्रश्नावर सुधीर मुनगंटीवार म्हणाले, “या शेतकऱ्यांच्या मृत्यूच्या घटना यावर्षीच्या नाहीत. तेव्हा एक समिती तयार करण्यात आली होती. समितीच्या माध्यमातून काही साहित्याचा पुरवठा देखील करण्यात आला होता. यावर्षी अशा काही घटना घडल्या तर सरकार संवेदनशीलपणे गंभीरपणे या गोष्टीची नोंद घेईल.”

हेही वाचा : Maharashtra Assembly Session: आदित्य ठाकरेंनी ‘लाज वाटली पाहिजे’ म्हणताच मुनगंटीवार संतापले, म्हणाले “आपल्याच पित्याला…”

शिर्डीतील साई मंदिरातील झटापटीवर बोलताना मुनगंटीवार म्हणाले, “स्थानिक ठिकाणी असणारी गर्दी, स्थानिक प्रश्न बघून तेथे योग्य निर्णय घ्यावा. त्याबाबत इथून काही सूचना करावी असं मला वाटत नाही.”