मुख्यंमंत्री एकनाथ शिंदे यांच्या खुर्चीवर त्यांचे सुपूत्र श्रीकांत शिंदे बसले असतानाचा फोटो राष्ट्रवादी काँग्रेसकडून ट्वीट करण्यात आला होता. त्यावरून विरोधकांकडून जोरदार टीका होत असताना भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसण्यात काहीही चुकीचं नाही, असे ते म्हणाले. तसेच यावेळी त्यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनाही टोला लगावला आहे.

हेही वाचा – Vedanta Foxconn : सध्याचं राज्य सरकार दिल्लीत ताकद लावण्यात कमी पडलं, हे सत्य नाकारता येणार नाही – रोहित पवार

काय म्हणाले सुधीर मुनगंटीवार?

“अडीच वर्षांत काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांना जनहिताचे काय निर्णय केले, हे सांगण्यासारखं काही राहिलंच नाही. शिवसेनेचा एक नेता राष्ट्रवादीच्या नेत्यासाठी कशा पद्धतीने खुर्ची घेऊन धावत गेला, हेही महाराष्ट्राने पाहिलं आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि त्यांचे सुपुत्र सोनिया गांधींच्या समोर किती वाकून अभिवादन करत होते, हेही महाराष्ट्रानं पाहिलं आहे. आता अडीच वर्षांत काय केलं, हे सांगण्यासारखं नसल्यामुळे कोण कुणाच्या खुर्चीवर बसलंय यावर बोलत आहेत. त्या खुर्चीवर कुणी एखादी व्यक्ती बसली, तर त्यात आक्षेपार्ह काहीच नाही. स्टेट वाईल्डलाईफ बोर्डाच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की तुम्ही उपाध्यक्ष म्हणून ही बैठक चालवायची आहे. त्यामुळे त्या खुर्चीवर मी बसलो, तर काहीतरी चुकलंय, असा त्याचा अर्थ होत नाही”, अशी प्रतिक्रिया भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.

हेही वाचा – “खुर्चीमागचा बोर्ड..”, श्रीकांत शिंदेंचं ‘त्या’ व्हायरल फोटोवर स्पष्टीकरण; म्हणाले, “मी दोन टर्म खासदार आहे, मला…”!

राष्ट्रवादी काँग्रेसने ट्वीट केला फोटो

मुख्यंमंत्री एकनाथ शिंदे यांच्या खुर्चीवर त्यांचे सुपूत्र श्रीकांत शिंदे बसले असतानाचा फोटो राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते रविकांत वरपे यांनी ट्वीट केला होता. “हा फोटो अतिशय जबाबदार व्यक्तीने मला पाठवला आहे. मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातला हा फोटो आहे. तिथे मुख्यमंत्री अधिकाऱ्यांच्या बैठका घेतात. अशा ठिकाणी त्यांचे सुपुत्र बसले आहेत. आम्ही त्यांना सुपर सीएम झाल्याच्या शुभेच्छाही दिल्या आहेत”, अशा शब्दांत रविकांत वरपे यांनी मुख्यमंत्र्यांना लक्ष्य केलं होते.

“कदाचित राज्याचे मुख्यमंत्री गणपती मंडळ, नवरात्र उत्सव, पितृपक्ष किंवा दिल्ली वाऱ्यांमध्ये व्यग्र असल्यामुळे राज्यातील इतर लोकांचं काम पाहण्याची जबाबदारी सुपर सीएम म्हणून श्रीकांत शिंदेंकडे दिली आहे, असं आम्हाला वाटतं. राज्याचा कारभार नेमका कोण पाहतंय? हे राज्य अधांतरी आहे असंच वाटतंय. ज्याला जे वाटतंय, तो ते करतोय”, असा टोलाही रविकांत वरपे यांनी लगावला होता.