“…सस्ती दारू, महंगा तेल!”; सुधीर मुनगंटीवारांनी उडवली ठाकरे सरकारची खिल्ली

विदेशी मद्यावरील एक्साइज ड्युटी कमी करण्याच्या निर्णयावरुन सरकारवर टीका

Sudhir-Mungantiwar-Uddhav
सुधीर मुनगंटीवार यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला

महाराष्ट्र सरकारने आयात केलेल्या विदेशी मद्यावरील एक्साइज ड्युटी इतर राज्यांच्या बरोबरीने आणण्यासाठी ५० टक्क्यांनी कमी केले आहे. त्यावरून भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी ठाकरे सरकारची खिल्ली उडवली आहे. महाविकास आघाडी सरकार म्हणजे तेरा खेल, सस्ती दारू महंगा तेल, अशी या सरकारची नीती आहे, असंही ते म्हणाले.

माध्यमांशी बोलताना सुधीर मुनगंटीवार म्हणाले, “जनतेच्या आशीर्वादाने लोकशाही मार्गाने सरकार निवडून येतात. त्या सरकारचा प्रत्येक निर्णय शेतकऱ्यांना समर्पित असतो. शोषित समाजाला समर्पित असतो. वंचित समाजाला समर्पित असतो. गोरगरिबांना समर्पित असतो. शेतमजुरांना समर्पित असतो. पण बेइमानीच्या आधारावर हे सरकार स्थापन झालेले आहे. जनतेने निवडून दिलेलं हे सरकार नाही”.

ते पुढे म्हणाले, “दारू स्वस्त करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यांचा हा निर्णय हर्बल वनस्पतीवाल्यांसाठी आणि क्रुझ पार्टीवाल्यांसाठी समर्पित आहे. सरकार पेट्रोल-डिझेलचे भाव कमी करत नाही. दारूचे पण भाव कमी करून बेवड्यांना ऊर्जा देण्याचं काम हे सरकार करत आहे”.

महाराष्ट्र सरकारकडून विदेशी मद्यावरील एक्साइज ड्युटीत ५० टक्क्यांची कपात

महाराष्ट्र सरकारने आयात केलेल्या विदेशी मद्यावरील एक्साइज ड्युटी इतर राज्यांच्या बरोबरीने आणण्यासाठी ५० टक्क्यांनी कमी केले आहे, असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने शुक्रवारी सांगितले. तसेच यासंदर्भातील अधिसूचना गुरुवारी जारी करण्यात आल्याचेही अधिकाऱ्याने स्पष्ट केले. “आयात केलेल्या विदेशी मद्यावरील एक्साइज ड्युटी, खर्चाच्या ३०० टक्क्यांवरून १५० टक्क्यांवर आणण्यात आली आहे,” असे अधिकाऱ्याने पीटीआयला सांगितले. अधिकाऱ्याने सांगितले की, “आयात केलेल्या विदेशी मद्याच्या विक्रीतून महाराष्ट्र सरकारला वर्षाला १०० कोटी रुपयांचा महसूल मिळतो. या कपातीमुळे सरकारचा महसूल २५० कोटी रुपयांपर्यंत वाढण्याची अपेक्षा आहे कारण यामुळे एक लाख बाटल्यांवरून २.५ लाख बाटल्यांची विक्री वाढेल”

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Sudhir mungantiwar slams maha vikas aghadi over cuts excise duty on imported liquor vsk

ताज्या बातम्या