Sudhir Mungantiwar Vs Ashish Shelar : सध्या राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशना दरम्यान विधानसभा आणि विधानपरिषद या दोन्ही सभागृहात विविध विषयांवरून सत्ताधारी पक्षाचे आमदार आणि विरोधी पक्षाच्या आमदारांमध्ये आरोप-प्रत्यारोप पाहायला मिळतात. या पार्श्वभूमीवरच आज विधानसभेत भारतीय जनता पक्षाचे नेते तथा आमदार सुधीर मुनगंटीवार आणि भारतीय जनता पक्षाचे नेते तथा मंत्री आशिष शेलार यांच्यात चांगलीच जुगलबंदी रंगल्याचं पाहायला मिळालं.
आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी विद्यार्थ्यांच्या भरती परीक्षांच्या मुद्यांवरून सरकारला काही प्रश्न विचारले. यावेळी बोलताना सुधीर मुनगंटीवार यांनी मंत्री आशिष शेलार यांना खोचक टोला लगावला. त्यानंतर प्रश्नांची उत्तरं देताना मंत्री आशिष शेलार यांनीही सुधीर मुनगंटीवार यांना टोला लगावला. त्यामुळे या दोन्ही नेत्यांमध्ये सभागृहात जुगलबंदी रंगल्याचं पाहायला मिळालं.
सुधीर मुनगंटीवार काय म्हणाले?
“सन्माननीय मंत्री महोदय (आशिष शेलार) अतिशय सकारात्मक पद्धतीने प्रश्नांचं उत्तरं देत आहेत. तुमचं उत्तर ऐकल्यावर खरंच तुम्ही चिरंजीवी मंत्री असावं किंवा त्यापेक्षाही तुम्ही आणखी पुढे जावो अशा आमच्या तुम्हाला शुभेच्छा आहेत. मात्र, एक गोष्ट लक्षात आली की भारताने टी-२० विश्वचषक जिंकल्यानंतर तुमचं उत्तर अतिशय सकारात्मक पद्धतीने आलं, कारण आज तुम्ही खूश आहात. तुम्ही खूश आहात तर मग आणखी चार ते पाच प्रश्नांची उत्तर अपेक्षित आहेत”, असं म्हणत सुधीर मुनगंटीवार यांनी भरती परीक्षांच्या मुद्यांवरून मंत्री आशिष शेलार यांना काही प्रश्न विचारले.
आशिष शेलार काय म्हणाले?
सुधीर मुनगंटीवार यांनी विद्यार्थ्यांच्या भरती परीक्षांच्या मुद्यांवरून विचारलेल्या प्रश्नांचं उत्तर देताना आशिष शेलार यांनी म्हटलं की, “सुधीर मुनगंटीवार यांनी विद्यार्थ्यांच्या भरती परीक्षांबाबत तीन प्रश्न उपस्थित केले आहेत. तसेच हे प्रश्न सभागृहात मांडताना त्यांनी माझी प्रशंसा केली त्याबाबत त्यांचे आभार. तसेच मला पूर्ण विश्वास आहे की सुधीर मुनगंटीवार यांनी माझी प्रशंसा अगदी मनापासून केली असावी. याबरोबरच मला पूर्ण विश्वास आहे की त्यांच्या मनात माझ्याविषयी दुसरा कोणताही विषय अकारण असणार नाही. मात्र, या चर्चेमुळे अकारण विषय बाहेर जाऊ नये म्हणून मी चिरंजीवी मंत्री राहील की नाही? हे मला माहिती नाही. पण अभिमन्यू सारखं मी चक्रव्यूहात मरून पडणार नाही एवढंच त्यांना सांगतो”, असं म्हणत आशिष शेलार यांनी सुधीर मुनगंटीवार यांना टोला लगावला.
