जालना : शेतकऱ्यांच्या उसाची एफआरपी (किमान आधारभूत किंमत) थकबाकीची वसुली जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील ‘समृध्दी शुगर्स’ या खासगी कारखान्यातील साखर तसेच अन्य उत्पादनाच्या विक्रीतून करावी. जर साखर तारण ठेवलेली असेल तर कारखान्याची स्थावर व जंगम मालमत्ता जप्त करून त्याच्या विक्रीतून ऊस उत्पादकांना थकबाकी द्यावी, असा आदेश साखर आयुक्तांनी काढला आहे. यासंदर्भात पुढील कारवाईसाठी जिल्हाधिकाऱ्यांना प्राधिकृत करण्यात आले आहे.
यासंदर्भातील आदेशात राज्याचे साखर आयुक्त सिध्दराम सालीमठ यांनी म्हटले आहे की, ३० एप्रिल २०२५ च्या अहवालानुसार ‘समृध्दी शुगर्स’ मध्ये ५ लाख ४ हजार ८९६ टन गाळप झाले असून साखरेचा उतारा ११.५९ टक्के आहे. त्यामुळे ऊसतोडणी व वाहतूक खर्च वजा जाता ढोबळ मानाने ‘एफआरपी’ प्रमाणे कारखान्याचा दर प्रती टन २ हजार ९७० रुपये येतो. ३१ मे २०२५ च्या अहवालानुसार १३ कोटी ६३ लाख ४२ हजार रुपये कारखान्याकडे ऊस उत्पादकांचे बाकी आहेत.
‘एफआरपी’ची थकबाकी आणि त्यावरील विलंबाचे १५ टक्के व्याज जमीन महसूल थकबाकी समजून साखर त्याचप्रमाणे कारखान्यातील उत्पादित उपपदार्थाची विक्री करून वसूल करावे. जर साखर तारण ठेवलेली असल्यास कारखान्याची स्थावर व जंगम मालमत्ता जप्त करून संबंधित दस्तऐवजांवर शासनाची नोंद घ्यावी.
जप्त मालमत्तेची विहित पद्धतीने विक्री करून त्यातून संबंधितांना व्याजासह थकबाकी द्यावी, असे या आदेशात म्हटले आहे. जालना जिल्हाधिकाऱ्यांना यासंदर्भातील पुढील कारवाईसाठी प्राधिकृत करण्यात आले आहे.