साखर कारखान्याच्या माध्यमातून केवळ साखर उत्पादन एवढाच उद्देश न ठेवता यापुढे हायड्रोजन निर्मितीकडे वळण्याची गरज आहे, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी केले. कुंडल येथे क्रांतीअग्रणी जी.डी. बापू लाड यांच्या स्मारक व समाधी स्थळाचे लोकार्पण पवार यांच्या हस्ते शुक्रवारी करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी आमदार अरूण लाड यांनी प्रारंभी प्रास्ताविक तर जिल्हा परिषदेचे माजी सदस्य शरद लाड यांनी स्वागत केले. याप्रसंगी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील, खासदार संजयकाका पाटील, आमदार सुमनताई पाटील, मानसिंगराव नाईक, डॉ. विश्वजित कदम, विक्रम सावंत, बबनदादा शिंदे, शशिकांत शिंदे आदींसह मान्यवर उपस्थित होते.
हेही वाचा- सांगली : पोषण आहारातून ३० विद्यार्थ्यांना विषबाधा
पवार म्हणाले, जी. डी. बापूंनी समाजातील वंचित घटकाच्या प्रगतीसाठी घेतलेल्या राजकीय भूमिकेचा गौरवपूर्ण उेख करीत या भागातील स्वातंत्र्यसैनिकांनी ब्रिटीश सत्तेविरूध्द लढा उभारला. स्वातंत्र्य प्राप्तीनंतर सामान्य माणसाच्या प्रगतीसाठी कष्ट घेतले. क्रांती कारखाना याच विचाराने चालविला जात असून देशपातळीवर या कारखान्याने चांगले नाव कमावले आहे. आता साखरेपासून इथेनॉल, वीज उत्पादन सुरू झाले असले तरी यापुढे हायड्रोजन उत्पादनाकडे वळवण्याची गरज असून यामुळे उस उत्पादकांना चांगले दाम देता येईल.
हेही वाचा- “शरद पवारांच्या प्रकृतीवर नक्कीच परिणाम…”, भाजपा खासदाराचं विधान; म्हणाले, “एवढी कट-कारस्थानं..!”
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील राजकीय टोलेबाजी करीत असताना म्हणाले, देशात सर्वाधिक अभियंते महाराष्ट्रात असताना परराज्यात कंपन्या जाणे राज्याला परवडणारे नाही. वेगवेगळ्या प्रथा, लव्ह जिहाद मोर्चासारखे प्रकार धर्मा-धर्मात विष कालवण्याचे काम करीत आहेत. अशांना कृष्णाकाठच्या मातीत रूजलेला स्वातंत्र्य सैनिकांचा विचार सांगण्याची गरज आहे.सत्तेसाठी समाजात दुही माजविण्याचे पाप करणार्यांना पुरोगामी विचारांनीच उत्तर देण्याची आवश्यकता आहे. हाच विचार तत्कालिन दक्षिण सातारा म्हणजेच आजच्या सांगली जिल्ह्यातील क्रांतीकारकांनी दिला आहे. यावेळी त्यांनी भाजपचे खा. संजयकाका पाटील यांना कानात बोटे घाला असे सांगून हशाही मिळवला.