वाई: कारखान्यांचा हंगाम संपत आला असला तरी राज्याबरोबर साताऱ्यातही शिल्लक उसाचा प्रश्न मोठा आहे. यासंदर्भात साखर आयुक्तांना सूचना देण्यात आल्या आहेत. हंगाम संपत आला असला तरी कारखाने सुरू ठेवून शिल्लक उसाचा प्रश्न निकाली काढण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सातारा येथे पत्रकार  परिषदेत सांगितले.

यावर्षी पाऊस चांगला झाल्याने उसाचे क्षेत्र वाढले आहे. त्याबरोबरच हेक्टरी टनेजही वाढले आहे.  सगळे कारखाने ऊस संपवण्याचा प्रयत्न करत आहेत.  शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी इतर कारखान्यांकडून या उसाचे गाळप करावे, यासाठी दि. १ मेपासून वाहतूक अनुदान आणि रिकव्हरी लॉस दिला जात आहे. सरकारकडून मिळणारे अनुदान थेट शेतकऱ्याला दिले जात आहे. शेतकऱ्याला चांगला दर मिळाला पाहिजे ही त्या मागची भूमिका आहे. त्या त्या विभागातील ऊस संपवण्यासाठी अधिकाऱ्यांना कामाला लावले आहे.

भोंग्याबाबत राज ठाकरे यांनी सरकारला इशारा दिला आहे. मात्र पोलीस यंत्रणा त्यांचे काम करीत आहे. कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस त्यांचे काम करतील. पार्थ पवार कोरेगाव मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढविणार असल्याचे वृत्तही धांदात खोटे असल्याचे सांगत त्यांनी याविषयीच्या चर्चाना पूर्णविराम दिला.

ओबीसी आरक्षणाचा लाभ त्या वर्गाला मिळायलाच हवा, असे महाविकास आघाडीचे धोरण आहे. ओबीसी आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला आहे. याबाबत सर्व स्तरावर चर्चा सुरू आहे .

मध्यप्रदेशचा निकाल काय येतोय ते पाहून याबाबत निर्णय घेणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकत्र लढवाव्यात असा आमचा सर्वाचा आग्रह आहे. परंतु काही निर्णय स्थानिक जिल्हा पातळीवर केले जातात. काही ठिकाणी दोन्ही तिन्ही पक्षांचे प्राबल्य असल्याचे दिसून येते. त्यामुळे त्या ठिकाणी मैत्रीपूर्ण निवडणुका होतील. अध्यक्ष उपाध्यक्ष निवडीत एकत्र येऊन याबाबत पुढचा निर्णय घेता येऊ शकेल . शरद पवार यांनी जातीजातीत किंवा मराठा मराठेतर असे वाद निर्माण केल्याचे त्यांच्यावर होणारे आरोपही बिनबुडाचे  असल्याचेही अजित पवार यांनी सांगितले.