शेतकरी हा अन्नदाताच नव्हेतर ऊर्जादाताही बनला पाहिजे. त्यासाठी काळाची गरज असलेल्या इथेनॉल उत्पादनाला साखर कारखान्यांनी प्राधान्य द्यावे असे आवाहन केंद्रीय रस्ते विकासमंत्री नितीन गडकरी यांनी केले. केंद्र सरकार इथेनॉलवर चालणाऱ्या वाहन निर्मितीला प्रोत्साहन देणार असल्याचे गडकरी यांनी स्पष्ट केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

लोकसभेच्या माढा मतदारसंघाचे भाजपचे खासदार रणजितसिंह निंबाळकर यांनी मंत्री नितीन गडकरी यांचा फलटणमध्ये भव्य नागरी सत्कार तसेच त्यांच्या हस्ते विविध विकासकामांचा शुभारंभ अशा आयोजित केलेल्या कार्यक्रमात गडकरी बोलत होते. उंडवडी कडेपठार-बारामती-फलटण रस्ता चौपदरीकरण व कॉक्रिटीकरण, शिंदेवाडी-भोर-वरंधाघाट रस्ता महामार्गाचे रुंदीकरण व कॉक्रिटीकरण कामाचा शुभारंभ, लोणंद-सातारा रस्ता मजबुतीकरणाचे लोकार्पण डिजिटल पध्दतीने मंत्री गडकरी यांनी केले.

मंत्री गडकरी म्हणाले, की सातारा जिल्ह्यातील महामार्गाची लांबी ४९.०४ किलोमीटरवरून आता ८५८ किलोमीटर झाली आहे. आळंदी-पंढरपूर १२ हजार कोटींचा पालखीमार्ग वारकऱ्यांसाठी सोयीसुविधांसह लवकरच पूर्ण होईल. त्याचे साधुंसंतांच्या हस्ते भव्य दिव्य कार्यक्रमाने शुभारंभ होईल. महाराष्ट्राला ऐतिहासिक सांस्कृतिक परंपरा आहे. संत वाङमय हे डिजिटल पध्दतीने तयार करण्याचा प्रयत्न आहे मुंबई- बंगळुरू महामार्गावर विविध सुविधांसह औद्योगिक वसाहत निर्माण करण्यात येणार असल्याने मोठया प्रमाणात रोजगाराच्या संधीही उपलब्ध होतील. त्याचबरोबर शेतमालालाही चांगला भाव मिळणार असल्याने या भागातील स्थलांतर कमी होईल असा विश्वास गडकरी यांनी दिला.

फलटण शहरांतर्गत रस्ता पूर्ण केला जाईल. फलटण-दहिवडी रस्त्याच्या कामाला निधी देवून प्रत्यक्ष कामालाही सुरुवात होईल. लोकप्रतिनिधींनी विकासकामांना निधीच्या केलेल्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिला जाईल, अशी ग्वाही गडकरी यांनी दिली.रणजितसिंह निंबाळकर म्हणाले, की आपण पालखी मार्गासाठी सातत्याने पाठपुरावा केला. त्यासाठी भूसंपादन झालेल्या लोकांना योग्य मोबदला देण्यात आला. माढा विविध विकासकामांसाठी नितीन गडकरींनी नेहमीच सहकार्य केले. फलटण शहरातील विकास कामांनाही निधी मिळवा अशी अपेक्षाही या वेळी व्यक्त केली.
रामराजे निंबाळकर यांनी या भागातील प्रलंबित प्रश्न व मागण्यांचा ऊहापोह करताना त्याच्या पूर्ततेचे आवाहन यावेळी बोलताना केले. श्रीनिवास पाटील यांनी महामार्ग महामंडळाचे काम जिल्ह्यात चांगल्या प्रकारे सुरु असल्याचे सांगत याबाबत समाधान व्यक्त केले. आमदार शहाजी पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sugar mills should give preference to ethanol nitin gadkari amy
First published on: 27-01-2023 at 21:54 IST