scorecardresearch

ऊस गाळपाची गती मंदावली, शेतकरी चिंतेत; लातूर जिल्ह्यातील चित्र

लातूर जिल्ह्यातील मांजरा परिवारातील साखर कारखान्याने गेल्या काही वर्षांत साखर कारखानदारी क्षेत्रात उत्कृष्ट नाव कमावले.

ऊस गाळपाची गती मंदावली, शेतकरी चिंतेत; लातूर जिल्ह्यातील चित्र
(संग्रहित छायाचित्र) photo source : loksatta file photo

प्रदीप नणंदकर, लातूर

लातूर : जिल्ह्यातील सहकारी व खासगी साखर कारखान्यांच्या गाळपाची गती मंदावली असल्याने ऊस उत्पादक शेतकरी चिंतेत आहेत. लातूर जिल्ह्यातील मांजरा परिवारातील साखर कारखान्याने गेल्या काही वर्षांत साखर कारखानदारी क्षेत्रात उत्कृष्ट नाव कमावले. राज्यातील सर्व गटांतील पारितोषिके मांजरा परिवाराने आजवर पटकावली आहेत. गतवर्षी जिल्ह्यातील उसाचे गाळप साखर कारखाने करू शकले नाहीत. कारण उसाची लागवड अधिक झाली होती व गाळप क्षमतेपेक्षा अधिकचा ऊस होता. त्यामुळे मांजरा परिवाराने आपल्या साखर कारखान्याची गाळप क्षमता वाढवण्याचे ठरवले.

गतवर्षी १५ जूनपर्यंत साखर कारखाने सुरू ठेवावे लागले, त्यामुळे कारखान्यातील अंतर्गत दुरुस्ती व गाळप क्षमता विस्ताराचे काम सुरू असल्यामुळे गळीत हंगामाचा शुभारंभ होऊनदेखील गाळपाने गती घेतली नाही. राज्यात २७ नोव्हेंबरअखेर २०२ लाख टन उसाचे गाळप झाले आहे. एकूण उसाच्या गाळपाच्या २० टक्के गाळप आतापर्यंतच पूर्ण झाले आहे. मात्र यादरम्यान लातूर जिल्ह्यातील चार लाख ४७ हजार टन इतकेच गाळप झाले आहे .वास्तविक जिल्ह्यात सहकारी व खासगी साखर कारखाने मिळून गाळप क्षमता ३६ हजार २५० मॅट्रिक टन दर दिवसाची आहे. या गाळपाचा सध्याचा साखर उताराही केवळ ८.६१ इतकाच आहे. या वर्षी साखर कारखान्याचे गाळप उशिरा सुरू झाल्यामुळे विरोधकांनी टीका सुरू केली आहे. शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख बळवंत जाधव यांनी जिल्ह्यातील मांजरा परिवारातील साखर कारखाने चालवणाऱ्यांचे खासगी साखर कारखाने आहेत. त्यांचे गाळप अधिक व्हावे यासाठी जाणीवपूर्वक सहकारी साखर कारखाने उशिरा सुरू केले जात आहेत. त्याबद्दलची आपण तक्रार शासनदरबारी करणार असल्याचे पत्रक त्यांनी प्रसिद्ध दिले आहे. भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार रमेश कराड यांनी स्वत:ला शेतकऱ्यांचे कैवारी समजून घेणारे व सहकारमहर्षी बिरुद लावणारी मंडळीही साखर कारखाने वेळेवर सुरू करत नाहीत. ऊस उत्पादक शेतकरी हे आपला ऊस स्वत:च्या लेकराप्रमाणे सांभाळतात. त्यांची अडचण होत असल्याबद्दल चिंता व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर मांजरा साखर कारखान्याचे उपाध्यक्ष श्रीशैल्य उटगे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, मांजरा साखर कारखान्याची गाळप क्षमता ३६०० मेट्रिक टन दर दिवसाची होती, ती आता सात हजार पाचशे मे. टन इतकी केली आहे. मांजरा परिवारातील रेणा सहकारी साखर कारखाना, मारुती महाराज सहकारी साखर कारखाना यांची गाळप क्षमता वाढवली जात असून त्यामुळेच कारखाना सुरू होण्यास थोडा अवधी लागतो आहे. मात्र अंतिमत: शेतकऱ्याचेच यात हित आहे. शेतकऱ्याची अडचण होऊ नये यासाठीच गाळप क्षमता वाढवली आहे. या वर्षी थोडा त्रास होईल, मात्र सर्वाचे गाळप होईल व कोणाचाही ऊस शिल्लक ठेवला जाणार नसल्याचे ते म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 01-12-2022 at 02:11 IST

संबंधित बातम्या