बीड : अतिरिक्त उसाचा प्रश्न गंभीर झाला असून त्याचा पहिला बळी गेवराई तालुक्यातील हिंगणगाव येथे गेला.  हिंगणगावातील ऊस उत्पादक शेतकऱ्याने उभ्या उसाचा फड पेटवून देत गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना बुधवारी दुपारी उघडकीस आली. नामदेव आसाराम जाधव (वय ३२) असे आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याचे नाव असून त्याच्याकडे बँकेसह खासगी कर्ज होते, अशी प्राथमिक माहिती आहे. 

तोडणीला आलेला ऊस एकही कारखाना घेऊन जात नाही, या नैराश्यातून त्यांनी टोकाचे पाऊल उचलत जीवन संपवल्याची गावात चर्चा आहे. दरम्यान, गेल्या अनेक दिवसांपासून अतिरिक्त उसाचा प्रश्न गंभीर बनलेला असतानाही अद्याप त्याच्या उपाययोजनेसाठी ठोस पावले उचलली जात नाहीत. शासनाने वाहतूक अनुदान देण्याचा निर्णय घेऊनही साखर कारखाने कार्यक्षेत्रातील ऊस गाळपाबाबतीत उदासीन असल्याने संताप व्यक्त होऊ लागला आहे.

मृत नामदेव जाधव यांच्याकडे तीन एकर शेती असून त्यापैकी एक एकरमध्ये ऊस लागवड करण्यात आली होती. तोडणीला आलेला ऊस कारखाने घेऊन जात नसल्याने ते गेल्या काही दिवसांपासून चिंतेत होते. बँकेसह खासगी कर्ज असल्याने ऊस कधी जाईल? जाईल की नाही? हा प्रश्न त्यांना सतत भेडसावत होता. उभा ऊस तोडणीअभावी तसाच राहिला तर कर्ज कसे फेडायचे? या चिंतेने ते अस्वस्थ होते. बुधवारी दुपारच्या सुमारास नामदेव एकटेच शेतात गेले. वाळत असलेला ऊस पाहून त्यांनी फड पेटवून दिला आणि त्याचठिकाणी असलेल्या लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन जीवन संपवले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार असून घरातील कर्ता पुरुष गमावल्याने कुटुंब उघडय़ावर पडले आहे. अतिरिक्त उसाचा प्रश्न सोडवण्यासाठी विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी सर्व कारखानदारांची बैठक घेत ऊस संपेपर्यंत गाळप सुरू ठेवण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. शासनानेही वाहतूक अनुदानासह उतारा तूट देण्याचा निर्णय घेतलेला आहे. तरीही हा प्रश्न मार्गी लागलेला नाही.

साखर कारखान्यावर गुन्हा दाखल करा – मोहन गुंड

गेवराई तालुक्यातील हिंगणगाव येथे नामदेव जाधव या शेतकऱ्यावर आत्महत्या करण्याची वेळ यावी हे अत्यंत दुर्दैवी आहे. साखर कारखानदारांनी किमान चार शब्द चांगले बोलून शेतकऱ्यांना धीर देणे आवश्यक आहे. मात्र तसे न होता कारखान्यातील अधिकारी, कर्मचारी ऊस उत्पादकांना अरेरावीची भाषा वापरतात. ऊस नेऊ शकत नाही, असे स्पष्ट सांगतात त्यामुळेच शेतकऱ्यांमध्ये नैराश्य येत असून त्यातून अशा घटना घडत आहेत. शेतात उभ्या उसाला देण्यासाठी पाणी नाही, पाणी उपलब्ध असेल तर वीज पुरवठा व्यवस्थित होत नाही. ऊसतोडीला येणारी यंत्रणा पैशांची मागणी करतात. अशी परिस्थितीत ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी नेमके करायचे काय? असा प्रश्न उपस्थित करत शेतकरी आत्महत्या प्रकरणात संबंधित कार्यक्षेत्रातील साखर कारखान्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी शेतकरी कामगार पक्षाच्या मोहन गुंड यांनी केली आहे.