सातारा : ‘समाजमाध्यमा’वरील आभासी जगातील बनावट नाव धारण केलेल्या मित्राचा मृत्यू झाल्याचे समजताच तो धक्का सहन न झाल्याने साताऱ्यातील कोरेगाव तालुक्यातील एका युवतीने आत्महत्या केली. विशेष म्हणजे यातील आभासी जगातील हा मित्र आत्महत्या केलेल्या तरुणीचीच मैत्रीण असून, ती बनावट नाव धारण करत तिच्याशी संवाद करत होती. संबंधित युवतीला पोलिसांनी अटक केली आहे.
या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे. समाजमाध्यमावर (इन्स्टाग्राम) घडलेल्या या प्रकाराबाबत माहिती अशी- दोन मैत्रिणींमधील एकीने तरुणाचे बनावट नाव धारण करीत आपल्या मैत्रिणीशीच ‘समाजमाध्यमा’वरील मैत्री जोडली. या मैत्रीचे पुढे प्रेमात रूपांतर झाले. यातून आत्महत्या केलेल्या तरुणीने बनावट नाव धारण केलेल्या ‘तरुणा’ला भेटण्याचा आग्रह सुरू केल्यावर बनावट नाव धारण केलेल्या युवतीची पंचाईत झाली. त्यातून मार्ग काढण्यासाठी मग तिने आणखी एक बनावट नावाने खाते तयार करून त्यावरून अगोदरच्या बनावट नाव धारण केलेला तरुणाचा मृत्यू झाल्याचे संबंधित युवतीला कळवले. याचा संबंधित युवतीला मोठा धक्का बसला. या नैराश्यातूनच तिने गळफास घेऊन नुकतीच आत्महत्या केली.
आणखी वाचा-कृष्णा खोऱ्यातील कोयनेसह ८ धरणांत ८० टक्क्यांहून अधिक जलसाठा
‘समाजमाध्यमा’वरील आभासी मैत्रीतून घडलेल्या या प्रकाराने सर्वत्र खळबळ उडाली आहे. या प्रकाराने पोलीस चक्रावले. त्यांनी याबाबत सायबर तज्ज्ञांची मदत घेत तपास करत याप्रकरणी बनावट नाव धारण करत मैत्रिणीची फसवणूक करणाऱ्या तरुणीविरुद्ध गुन्हा दाखल करत तिला अटक केली आहे.
© The Indian Express (P) Ltd