मुलगा आणि मुलीला विष पाजून सांगलीत दाम्पत्याची आत्महत्या

सावकाराच्या कर्जातून ही घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येतो आहे.

सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील बनेवाडीत पती-पत्नीने आपल्या पोटच्या मुलांना विष पाजून नंतर आत्महत्या केल्याचा प्रकार सोमवारी सकाळी उघडकीस आला. सावकाराच्या कर्जातून ही घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येतो आहे. संजय यादव (४५), जयश्री यादव (३०), राजवर्धन यादव (४) आणि समृद्धी यादव (सहा महिने) अशी या घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इस्लामपूरजवळ असलेल्या बनेवाडीत यादव कुटुंब राहाते. सोमवारी पहाटेच्या सुमारास संजय आणि जयश्री या दोघांनी राजवर्धन आणि समृद्धी या आपल्या दोन्ही मुलांना विष पाजले. त्यात त्या दोघांचा मृत्यू झाला. यानंतर या दोघांनीही गळफास लावून घेत आत्महत्या केली. शेजारच्या लोकांमुळे हा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर तातडीने पोलिसांना घटनास्थळी बोलावण्यात आले. सावकाराच्या कर्जामुळे ही घटना घडली असण्याची शक्यता वर्तविण्यात येते आहे. पोलिसांनी चारही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविले आहे. सांगली ग्रामीण पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Suicide of couple in sangli district