सोलापुरात शेततळ्यात पडून तिघा मायलेकींचा मृत्यू

बेशुध्दावस्थेत पाण्याबाहेर काढून रूग्णालयात दाखल केले असता तिघींचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

(प्रतिनिधिक छायाचित्र)

सोलापूर : उत्तर सोलापूर तालुक्यातील पाथरी येथे एका शेततळ्यात तिघा मायलेकींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. शुक्रवारी दुपारी चारच्या सुमारास ही दुर्घटना उजेडात आली. मात्र हा प्रकार अपघाती, आत्महत्येचा की हत्येचा आहे, याचा उलगडा लगेचच झाला नाही.

सारिका अक्षय ढेकळे (वय २२) हिच्यासह तिच्या मुली गौरी (वय ५) आणि आरोही (वय २) अशी दुर्दैवी मृतांची नावे आहेत. यासंदर्भात पाथरी गावचे उपसरपंच श्रीमंत बंडगर यांनी दिलेल्या प्राथमिक माहितनुसार मृत सारिका हिचे पती अक्षय ढेकळे यांची गावच्या शिवारात द्राक्ष बाग आहे. शेजारीच त्यांच्या बहिणीचीही शेती आहे. तेथे शेततळे उभारले आहे. सारिका व तिच्या दोन्ही चिमुकल्या मुली या शेततळ्यात पडून पाण्यात बुडाल्या. त्यांना बेशुध्दावस्थेत पाण्याबाहेर काढून रूग्णालयात दाखल केले असता तिघींचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. या दुर्घटनेमुळे पाथरी गावावर शोककळा पसरली आहे. गेल्या २ जानेवारी रोजी याच तालुक्यात मार्डी येथेही शेततळ्यातील पाण्यात बुडून तीन किशोरवयीन मुलींचा मृत्यू झाला होता. त्यानंतर आता पाथरी येथे ही दुसरी दुर्घटना घडली.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Suicide or murder north solapur taluka three death farm akp

Next Story
“तू जहाँ जहाँ चलेगा, मेरा साया साथ होगा”, गोपीचंद पडळकरांचा नाव न घेता शरद पवारांवर हल्लाबोल
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी