अहिल्यानगर:भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी खासदार डॉ. सुजय विखे यांच्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीतील उमेदवारीला आव्हान देणारी याचिका उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठात दाखल झाली आहे. या याचिकेवर आज, शुक्रवारी दोन्ही बाजूंच्या वकिलांनी युक्तिवाद पूर्ण केला. त्यामुळे आता या याचिकेवर न्यायालय काय निकाल देते याकडे जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. येत्या सोमवारी निकाल अपेक्षित आहे. बुधवारी निवडणुकीत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत आहे.
जिल्हा सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीची प्रक्रिया सध्या सुरू आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत संपलेली आहे. त्यावर छाननी झाली आहे. छाननीमध्ये राहाता सेवा संस्था मतदारसंघातून माजी खासदार सुजय विखे व एकनाथ घोगरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. या दोघांनीही परस्परांच्या उमेदवारी अर्जाला छाननीवेळी हरकत घेतली होती. सुजय विखे हे राहुरी सहकारी साखर कारखान्याचे थकबाकीदार आहेत, या मुद्द्यावरून त्यांचा उमेदवारी अर्ज बाद ठरवण्याची मागणी विरोधी उमेदवार एकनाथ घोगरे यांनी केली होती.निवडणूक निर्णया आधिकारी तथा सहकार विभागाचे जिल्हा उपनिबंधक मंगेश सुरवसे यांनी ही मागणी फेटाळल्यानंतर एकनाथ घोगरे यांनी उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठात धाव घेतली.
आज या प्रकरणावर दोन्ही बाजूच्या वकिलांनी न्यायमूर्ती मंजुषा अजय देशपांडे यांच्यापुढे सविस्तर युक्तिवाद केला. विखे यांच्या वतीने अॅड. विनायक होन व अॅड. अभय ओस्तवाल, घोगरे यांचे वतीने अॅड. प्रतिक तलवार, अॅड. रिशाब तलवार व अॅड. सुरेश लगड यांनी तर महाराष्ट्र सरकारच्या वतीने अॅड. सुभाष तांबे, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या वतीने अॅड. योगेश कदम यांनी काम पाहिले.
सुजय विखे यांची उमेदवारी कायम ठेवण्याच्या बाजूने तर त्यांच्या अर्जाला आक्षेप घेणाऱ्या घोगरे यांच्याकडून कायदेशीर तरतुदींचा आधार घेत युक्तिवाद करण्यात आला. विखे हे राहुरी साखर कारखान्याचे निवडून आलेले संचालक नसून केवळ तज्ज्ञ संचालक होते, कारखान्याच्या संचालक मंडळाला तांत्रिक अडचणीच्या वेळी तज्ज्ञ म्हणून सल्ला देण्यापुरतीच त्यांची भूमिका होती. जिल्हा बँकेने कारखान्याला दिलेल्या कर्जासाठी त्यांना वैयक्तिकरित्या जबाबदार धरता येणार नाही. विखे यांच्याकडे वैयक्तिक थकबाकी असती तर जिल्हा बँकेने त्यांना त्यासंदर्भात स्वतंत्र नोटीस दिली असती, असा बचाव वकिलांनी केला तसेच निवडणूक प्रक्रियेतील संबंधित टप्पा व कायदेशीर तरतुदींचा विचार करता घोगरे यांची याचिका ग्राह्य धरता येणार नाही असा दावा करत याचिका फेटाळण्याची मागणी विखे यांच्यावतीने करण्यात आली.
तर दुसरीकडे घोगरे यांच्या वतीने युक्तिवाद करताना, विखे हे २०१७ ते २३ कालावधीत राहुरी साखर कारखान्याचे तज्ज्ञ संचालक होते. कारखान्यांनी जिल्हा बँकेकडून कर्ज घेतले. त्यावेळी ते या पदावर होते. कर्ज प्रकरणाशी संबंधित कागदपत्रांवर विखे यांच्या साह्या आहेत. त्यांच्यासह इतर संचालकांनी वैयक्तिक हमी दिली आहे. सहकारी संस्थेच्या थकबाकीशी संबंधित कायदेशीर तरतुदीनुसार थकबाकीदार व्यक्तीला सहकारी संस्थेची निवडणूक लढवण्यास अपात्र ठरवता येते. त्यामुळे विखे यांचे उमेदवारीची पात्रता तपासताना या बाबींचा विचार करावा, असा युक्तिवाद घोगरे यांच्या वतीने वकिलांनी केला.
निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या वतीने युक्तिवाद करताना वकिलांनी संबंधित प्रकरणात कायद्याला अभिप्रेत असलेली संक्षिप्त चौकशी करूनच निर्णय घेण्यात आल्याचा दावा करण्यात आला.
