अहिल्यानगर: राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) व भाजप यांच्या युतीला महापालिकेत स्पष्ट बहुमत मिळाले. त्यामुळे महापालिकेतला घोडेबाजार आम्ही हाणून पाडला. यापूर्वी पदाधिकारी निवडीत जो तमाशा चालायचा, तो यंदा प्रथमच बंद केला, असा खळबळजनक दावा भाजपचे माजी खासदार डॉ. सुजय विखे यांनी केला. यावेळीने राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप उपस्थित होते.

महापौरपदी ज्योती गाडे व उपमहापौरपदी धनंजय जाधव यांची निवड झाल्यानंतर दोघांनी लगेचच आमदार जगताप व माजी खासदार विखे यांच्या उपस्थितीत पदभार स्वीकारला. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना विखे यांनी हा दावा केला. युतीचे नगरसेवक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. महापालिकेत राष्ट्रवादीला २७ तर भाजपला २५ असे युतीला ६८ पैकी एकूण ५२ संख्याबळ मिळालेले आहे. ते बहुमतापेक्षा कितीतरी अधिक आहे.

माजी खासदार विखे म्हणाले, पूर्वी विकास कामांचे ठराव करण्यासाठी महापालिकेत पैसे द्यावे लागायचे. आता ती गरज भासणार नाही. आम्ही निवडून येण्यापूर्वी कोणताही वचननामा प्रसिद्ध केला नव्हता. त्याचे पालन होत नसल्याने प्रसिद्ध केला नव्हता. त्यामुळे आता आम्ही वचननामा प्रसिद्ध करून त्यानुसार पुढे काम करू.

सुजय विखे म्हणाले, युतीच्या माध्यमातून प्रथमच इतके मोठे संख्याबळ प्राप्त झाले. त्यातून गाडे व जाधव यांची निवड झाल्याचा मोठा आनंद आहे. हा विजय आम्ही उपमुख्यमंत्री अजित पवार यांना समर्पित करतो, आम्हाला मिळालेले यश हे आमदार संग्राम जगताप यांच्या कामाची पावती आहे. नागरिकांनी दोन्ही पक्षांवर मोठा विश्वास दाखवला. शहरात प्रचंड प्रश्न आहेत. आम्ही यंदा राज्याच्या अंदाजपत्रकाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेणार होतो व १०० कोटी रुपयांची मागणी शहरासाठी करणार होतो, परंतु दुर्दैवाने अजितदादांचे अपघाती निधन झाले. आता आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेऊन निधी आणू .

तीन महिन्यात शहर विकासाचा आराखडा

पुढील तीन महिन्यात शहर विकासाचा आराखडा तयार करून तो नगरसेवक व नागरिकांपुढे मांडला जाईल. हाच आमचा वचननामा असेल. त्यानुसार आम्ही काम करू. आमचे पहिले लक्ष उपनगर विकासावर आहे. उपनगरातून शहर वाढते आहे, तसे प्रश्नही निर्माण झाले आहेत. अनेक प्रकल्प अपूर्ण अवस्थेत आहेत, ते पूर्ण करण्यास प्राधान्य राहील, असेही माजी खासदार विखे यांनी सांगितले.