भारतीय जनता पक्षाचे नेते तथा माजी खासदार सुजय विखे-पाटील हे कायम कोणत्या न कोणत्या कारणांनी चर्चेत असतात. आता सुजय विखे यांनी एक अजब वक्तव्य केलं आहे. अहिल्यानगर-मनमाड महामार्गाचं काम डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे रखडल्याचं अजब वक्तव्य सुजय विखे यांनी केलं आहे.

तसेच ‘ट्रम्प यांच्यासारखा वेडा माणूस मी उभ्या आयुष्यात पाहिला नाही’, असंही सुजय विखे यांनी अहिल्यानगरमधील एका कार्यक्रमात बोलताना मिश्किलपणे म्हटलं आहे. त्यांच्या या वक्तव्याची सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा रंगली असून ते पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत.

सुजय विखे काय म्हणाले?

जागतिक युद्धामुळे डांबराच्या तुटवड्याचा प्रश्न निर्माण झाला असून त्याचा फटका अहिल्यानगर-मनमाड महामार्गाच्या कामाला बसल्याचा दावा सुजय विखे यांनी केला आहे. सुजय विखे म्हणाले की, “डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणवर मिसाईल टाकताना या रस्त्याच्या ठेकेदाराला विचारलं होतं का? की मला विचारलं होतं? मी देवा शप्पथ सांगतो, असा वेडा माणूस मी माझ्या आयुष्यात कधी पाहिला नाही. त्या माणसांच्या नादाला न लागणं हेच आपल्यासाठी योग्य आहे”, असं सुजय विखे यांनी म्हटलं आहे.

“अहिल्यानगर-मनमाड महामार्गाच्या ठेकेदाराला आज डांबर मिळत नाहीये. त्या ठेकेदाराला दिल्लीवरून डांबर आणावं लागत आहे. त्यामुळे मग त्याचा खर्च वाढतो. ज्या रस्त्याची किंमत आज पाच रुपये असेल तर त्याची किंमत अडीच पटीने वाढते आणि त्यासाठी पुन्हा मंजुरी घ्यावी लागते. हे सगळे टेक्निकल मुद्दे असतात. सध्या रस्त्याच्या बाबातीत लोकांच्या भावना रास्त आहेत. मात्र, वास्तविकता वेगळी आहे. सध्या अमेरिका-इराण युद्धामुळे कच्च्या तेलाची परिस्थिती आणि डांबर मिळण्याची परिस्थिती अवघड आहे. आजही मार्केटमध्ये डांबर उपलब्ध नाही”, असं सुजय विखे यांनी म्हटलं आहे.

‘राजकारणात आलो आणि माझा मेंदू खराब झाला’

“मी मेंदूचा डॉक्टर झालो. पण मी राजकारणात येऊन माझा मेंदू खराब झाला. आपण शिक्षण घेतलं, आपण म्हणलं लोकांचे मेंदू ठीक करू. पण आपलाच मेंदू ठीक राहिला नाही. आपण राजकारणात मतं मागायला आलो, आपल्याला वाटलं कामातून मते मिळतील, त्यामुळे कामंही केली. ४० वर्ष नगरच्या ब्रिजचं काम होत नव्हतं, ते आपण दोन वर्षांत केलं. नगरचा बायपास रोड केला, नगर-करमाळा रोड केला. ४० हजार कोटींचे कामे पूर्ण केले. मात्र, मला काय जमलं नाही? तर मला कधी अॅक्टींग करता आली नाही, कधी रस्त्यावर झोपता आलं नाही, खोटे शब्द आपण कधी दिले नाहीत”, असं म्हणत सुजय विखे यांनी खासदार निलेश लंके यांना अप्रत्यक्ष टोला लगावला.